अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : चांदूर रेल्वे तालुक्यातील चिरोडी येथे बिबट्याने दोन बकऱ्यांवर हल्ला करत त्यांना ठार केल्याची घटना समोर आली आहे. बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करा अशा मागणीचे निवेदन ग्रामपंचायत, चिरोडी तर्फे स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी बी. आर. पवार यांना देण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिरोडी या गावात सतत 3 दिवसांपासून वन्यप्राणी बिबट्या हा गावात येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला करीत आहे. मुरली चंदु राठोड आणि पुंजीलाल जाधव या दोन्ही गावकऱ्यांच्या बकऱ्यांवर हल्ला करुन दोन बकऱ्यांना ठार केल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या दोन्ही गावकऱ्यांना मोबदला देण्यात यावा तसेच  बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामपंचायत तर्फे उपसरपंच संदीप कुमरे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.


बिबट्याच्या जनजागृतीसाठी गावात दवंडी - 


चिरोडी गावातून बिबट्यासंदर्भात निवेदन आल्यानंतर कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच गावकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी गावात दवंडी दिल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले. तसेच रात्रीच्या वेळी लहान मुलांना घराबाहेर पडू देऊ नये व नागरिकांना रात्रीच्यावेळी आवश्यक काम असल्यास समूहाने जावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी बी. आर. पवार यांनी केले आहे.