पुणे : एका निनावी पत्रामुळे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ मराठ्यांचा पक्ष झाला असल्याची तक्रार या पत्राद्वारे करण्यात आली आहे. पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांना हे पत्र पाठवण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे शहर अध्यक्षांसह ७ विधानसभा अध्यक्ष मराठा आहेत. अजित पवारांकडून इतर समाजातील कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचं कार्यकर्त्यांची भावना आहे. माजी अध्यक्षा वंदना चव्हाण यांच्याकडून पक्षाचं वाटोळं झाल्याचं देखील या पत्रात म्हटलं आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याच्या मनातील खदखद आणि पक्ष संघटना तसेच नेत्यांविषयीच्या तक्रारींचा पाढाच एका कार्यकर्त्यानं पाठवलेल्या पत्रात वाचण्यात आला आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या नेमकं काय सुरु आहे याचा इत्यंभूत उहापोह या दोन पानी पत्रात करण्यात आला आहे. पुणे शहरातील स्थानिक नेते तसेच पदाधिकाऱ्यांसह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यंमत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदींना या पत्राच्या प्रति पाठवण्यात आल्या आहेत. या लेटर बॉम्बमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 


विधानसभा अध्यक्षांसह बहुतेक आघाड्या तसंच सेलचे प्रमुख मराठा समाजाचे आहेत. अजित पवारांनी जात बघून नियुक्त्या केल्या. पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना सर्वांना विचारात घेतलं नाही. माजी अध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या काळात पक्षाचं वाटोळं झालं. विद्यमान अध्यक्ष चेतन तुपे पार्टटाईम आहेत. पक्ष संघटनेत सारं काही आलबेल नाही. परिस्थितीत सुधारणा आवश्यक अन्यथा पक्ष कोमात जाईल. असं या पत्रात म्हटलं आहे.


मात्र पत्रात केलेल्या तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचं सांगत हे विरोधकांनी रचलेलं कारस्थान असल्याचा आरोप पक्षातर्फे करण्यात आला आहे. 


भारतीय जनता पक्षानं हे आरोप फेटाळले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थितीचं राष्ट्रवादीकडून राजकारण सुरु आहे. त्यापेक्षा त्यांनी या पत्रावर चिंतन करावं असा सल्ला भाजपनं दिला आहे. 


राष्ट्रवादीची पक्ष संघटना तसेच कामकाजात तातडीनं सुधारणा केली नाही तर विधानसभा निवडणुकीनंतर पक्ष कोमात जाईल, असा खोचक इशारा या पत्रात देण्यात आलाय. विशेष म्हणजे या पत्रावर ते पाठवणाऱ्याचं नाव नाही. पक्षाच्या असंख्य निष्ठावंत कार्यकर्त्यांचं मनोगत असा उल्लेख पत्राच्या अखेरीस करण्यात आला आहे.