नाशिक : भाजप गटनेत्यांकडून भाजपच्याच नेत्यांवर भ्रष्टाचार प्रकरणी लेटर बॉम्ब टाकल्याने राजकीय भूकंप झाला आहे. भाजप आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी यांची सत्यमापन चाचणीची (नार्को टेस्ट लाय डिटेक्टर चाचणी ) मागणी करण्यात आली आहे. भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे ही मागणी केली आहे. या नेत्यांबरोबरच नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांची लाय डिटेक्टर चाचणीची मागणीही करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकणामुळे भाजप अडणीत सापडला आहे. विरोधकांना आयता भ्रष्टाचाराचा मुद्दा हातात मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक महापालिकेतील आमदारांच्या हस्तक्षेपामुळे पालिकेतील पदाधिकाऱ्यांमधील वाद टोकाला पोहोचले आहेत. गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण केंद्रासाठी महापालिकेने आरक्षण बदलाच्या मंजुर केलेल्या ठरावात आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी तसेच माजी सभागृह नेते संभाजी मोरुस्कर यांच्या दबावातून परस्पर बदल झाल्याचा प्रकार भाजपच्याच गटनेत्यांसह चार नगरसेवकांनी उघडकीस आणला आहे.


दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या अखत्यरीत येत असलेल्या गृहविभागाच्या इमारतीसाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द टाकला असतांना, सबंधित पदाधिकाऱ्यांनी उपसूचनेद्वारे गटनेत्याला अंधारात ठेवून सर्व काही केल्याचे लक्षात आल्यानंतर चार नगरसेवकांनी थेट आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत वादा विकोपाला गेला आहे. विशेष म्हणजे सानप, भानसी, मोरुस्कर यांच्यासह नगरसचिव विभागातील अधिकाऱ्यांची लाय डिटेक्‍टर चाचणी करण्याची मागणी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी केल्याने भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.