रवींद्र कांबळे, झी मीडिया, मुंबई : सांगली जिल्ह्यातील गार्डी येथे १९ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करून आणि तिचा खून केल्याप्रकरणी तीन आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सांगली जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला आहे. आरोपी अनुज पवार, दादासाहेब आठवले आणि लक्ष्मण सरगर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली आहे. २०१२ साली गार्डी शहरातील १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली जिल्ह्यातील गार्डी येथील एक १९ वर्षीय युवतीचे आणि लक्ष्मण सरगर यांचे प्रेम संबंध होते. त्यातूनच दोघे १२ ऑक्टोबर रोजी पळून गेले होते. चार दिवसानंतर त्या तरुणीचा मृतदेह गर्दी येथील तारळेकर यांच्या विहिरीमध्ये १६ ऑक्टोबर २०१२ साली आढळला. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांनी याबाबत कसून चौकशी सुरु केली. सदर मुलीच्या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता शवविच्छेदन अहवालामध्ये तिचा मृत्यू विहिरीत पडून नव्हे तर तीन दिवसांपूर्वी झाल्याचे उघडकीस आले. तसेच तिच्यावर सामूहिक बलात्कार करून अमानुष रित्या तिचा खून करून तिचे हात बांधून विहिरीत फेकले असल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले.


शवविच्छेदनाचा अहवाल येताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासामध्ये पीडित मुलगी ही गार्डी येथील लक्या उर्फ लक्ष्मण सरगर याच्या प्रेमात पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने लक्ष्मण सरगर यास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने त्याचे तीन मित्र अनुज बाबर, दादासो आठवले, आणि सागर हत्तीकर यांनी मिळून एका निर्जन स्थळी नेऊन तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. 


सामूहिक बलात्कार करून त्यानंतर पीडितेच्या गळा दाबून खून करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतून विहिरीत फेकल्याचे निदर्शनास आल्यानेच अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर यांनी आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप, तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.