योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : केवळ नाशिक जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्याला हादरवणारा नरबळीचा प्रकार त्र्यंबकेश्वरच्या टाकेहर्ष या गावात घडला. घरातल्या महिलांमुळेच सुख समाधान नाही, पैसा अडका टिकत नाही म्हणून सख्ख्या आईसह दोन वृद्ध महिलांचा नरबळी देण्याचा अघोरी प्रकार घडला होता. यातल्या ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आज सुनावण्यात आली.


राज्याला हादरवणाऱ्या नरबळी प्रकरणी शिक्षा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेहरे झाकणाऱ्या या नराधमांमध्ये काही महिलाही आहेत. यात दोषींमध्ये आहे हत्याकांडाची मुख्य सूत्रधार महिला मांत्रिक बच्चीबाई खडके उर्फ घोडा... दोरे कुटुंबातल्या काशिनाथ आणि गोविंद यांना त्यांच्या आई आणि बहिणीमुळे कौटुंबिक स्वास्थ्य मिळत नाही असं या महिला मांत्रिकाने सांगितलं.


सख्ख्या आईचा केला होता खून


दोघी जणी भुताटकी असल्याच्या संशयातून दोन्ही भावांनी आई बुधाबाई आणि बहिण राहीबाईला या मांत्रिकाच्या ताब्यात दिलं. बळी देण्यासाठी बुधाबाईच्या शरीरावर मांत्रिकाने अक्षरशः नाचत नाचत हाल हाल केले. त्यांचे डोळेही काढून घेतले. या हालअपेष्टांमधून राहिबाईने जीव वाचवत पळ काढला. श्रमजीवी संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हा प्रकार घोटी पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी अटकसत्र सुरू केले.


महिलेला भुताटकी ठरवून नरबळी


विशेष म्हणजे जीव वाचवून पळालेल्या राहीबाईने याबाबत मोखाडा पोलिसांत तक्रारही केली होती. पण ठाणे पोलिसांनी या घटनेकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. महिला मांत्रिकाला सामर्थ्य वाढवण्यासाठी आणि मंदिर उभारणीसाठी एकूण सात बळी द्यायचे होते. त्यातील दोन बळी उघड झाले आहहेत. पोलिसांनी दफन केलेल्या जागी प्रेत उकरून काढत प्रकरणाचा छडा लावला असला तरी अजून किती बळी गेलेत हे शोधण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे.


राज्यात जादूटोणा प्रतिबंधक कायदा लागू होऊन वर्ष झालं तरी या कायद्याचा म्हणावा तसा धाक निर्माण झालेला नाही. नाशिक जिल्ह्याच्या आदिवासी भागात घडलेल्या या भयानक हत्याकांडाने अंधश्रद्धेचा भेसूर चेहरा जगासमोर आणला आहे. महिला मांत्रिकाचा बळी घेणं हा धंदाच होता. पण अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आपल्या आईचा बळी देणारे नराधम अजूनही या जगात आहेत हेच संतापजनक...