Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेते नारायण राणे यांना अटक झाली होती. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वक्तव्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारावाई करण्यात आली होती. आता अशाच प्रकारची कारवाई उद्धव ठाकरे यांच्यावर होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दात टीका केली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल होवून उद्धव ठाकरेंना अटक देखील होवू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नालायक म्हंटले


उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांना नालायक असे म्हंटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नालायक म्हणणा-या उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याच्या हालचाली शिंदे सरकारनं सुरू केल्या आहेत. उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याचे संकेत उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. 


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर टीका केल्याबद्दल नारायण राणेंवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्याप्रमाणं आता शिंदेंवर टीका केली म्हणून ठाकरेंवर कारवाई करण्यात येणार असल्याचं समजतंय. याबाबत कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून कारवाई केली जाईल, असं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केले आहे. तर, वैफल्यातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांवर टीका करत असल्याचा पलटवार मंत्री शंभूराज देसाईंनी केलाय.


सरकारमध्ये ताकद असेल तर कारवाई करावी; विरोधी पक्षनेते अंबादास दावनेंचं सरकारला आव्हान


एकीकडे उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्याच्या हालचाली शिंदे सरकारनं सुरू केल्या आहेत. तर, दुसरीकडे सरकारमध्ये ताकद असेल तर कारवाई करावी असं आव्हान विरोधी पक्षनेते अंबादास दावनेंनी शिंदे सरकारला दिले आहे. 


उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका


अवकाळीग्रस्त शेतक-यांना मदत करण्यासाठी आजच्या आज मंत्रिमंडळ बैठक घ्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. राज्यातला शेतकरी अवकाळीने संकटात सापडला असताना मुख्यमंत्री तेलंगणात प्रचाराला कसे जाऊ शकतात असा सवालही उद्धव ठाकरेंनी केलाय. समाजाच्या मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. मात्र, सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचं राजकारण करतंय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. 


2021 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली होती नारायण राणे यांना अटक


2021 मध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांना अटक झाली होती.  तेव्हा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणण्या ऐवजी हिरक महोत्सवी वर्ष असे म्हणाले होते. यावेळी तेथे उफस्थित असलेले राज्याचे तत्कालिन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी संबधित बाब  तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शानास आणून दिली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी तात्काळ आपली चूक सुधारली. यावरुनच नारायण राणे यांनी गंभीर टीका केली होती. मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी  तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केला होता.