Sharad Pawar Vs Ajit Pawar : शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी पक्ष देखील फुटला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलीय की नाही, यावरून पवार कुटुंबियांकडून उलटसुलट दावे केले जात आहेत. तर, दुसरीकडं राष्ट्रवादी पक्षावर आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावर अजित पवार गटानं ठाम दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कुणाची याबाबत राष्ट्रवादीच्याच एक बड्या नेत्याने मोठ वक्तव्य केले आहे. 


बीडच्या सभेत प्रफुल्ल पटेल यांचा मोठा दावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांकडंच राहिल, असा ठाम दावा बीडच्या सभेत प्रफुल्ल पटेल यांनी  केला आहे. एवढंच नव्हे तर येत्या 30 सप्टेंबरपर्यंत निवडणूक आयोग याबाबतची अधिकृत घोषणा करेल, असंही त्यांनी जाहीर केलं. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, असा संभ्रम 


शरद पवारांनी उभ्या केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी उभी फूट पडली. अजित पवार गट भाजपसोबत सत्ताधारी पक्ष बनला. तर शरद पवारांनी भाजप विरोधाची भूमिका कायम ठेवत इंडिया आघाडीची वाट धरली. त्यामुळं खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, असा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, अजित पवारांचा पक्षच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं पटेल १०० टक्के खात्री देऊन सांगत आहेत.


राष्ट्रवादी काँग्रेसचा फैसला  सत्ताधारी अजित पवार गटाच्या बाजूनंच होणार का? 


शिवसेनेतील वादानंतर निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंच्या बाजूनं कौल दिला होता. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडे सोपवलं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा फैसला देखील सत्ताधारी अजित पवार गटाच्या बाजूनंच होणार का, याबाबतची उत्सूकता ताणली गेलीय. भाजपनं तर तसं सूतोवाचही केले आहे. तर, केंद्र सरकारच्या आशीर्वादाने पक्ष बळकावले जात असल्याची टीका विरोधी पक्षाकडून केली जात आहे.


घडाळ्याचे काटे नेमकं कुणाच्या बाजूनं फिरणार?


राजकीय जीवनात आतापर्यंत विविध चिन्हांवर आपण निवडणुका लढवल्याचा दाखला शरद पवार वारंवार देतात. मात्र, पक्षाचं नाव आणि चिन्ह जायला नको म्हणून पक्ष फुटला नसल्याचंही पवार सांगतात. हा त्यांचा रणनीतीचा भाग असला तरी अजित पवारांचा गट आता चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसतंय. त्यामुळे घडाळ्याचे काटे नेमकं कुणाच्या बाजूनं फिरणार आणि शिवसेनेसारखा राष्ट्रवादीत संघर्ष पाहायला मिळणार याकडे राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागले आहे.