Breaking News LIVE Updates:जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबवा, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
Maharashtra Breaking News LIVE Updates: आज वर्षाचा शेवटचा दिवस... सगळीकडेच नवीन वर्षाच्या स्वागताची लगबग सुरु असतानाच दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊयात...
Latest Updates
जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबवा, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मंगळवारी पार पडली असून यात जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबवली जावी असे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आली आहे. विशेष सहाय्याच्या योजनांचे अनुदान डिबीटी प्रणालीद्वारे वितरित करा, वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पुढील १०० दिवसांमध्ये सामाजिक न्याय विभागाने करावयाच्या कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मुंबईकर आणि प्रशासन सज्ज
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी प्रशासन सज्ज झालं असून संपूर्ण मुंबईत 12048 पोलीस कर्मचारी तैनात असणार असून यात 2400 महिला पोलिसांचा समावेश आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या टीमही तयार आहे. थर्टी फर्स्ट नाईट लाईफ मध्ये हॉटेलमध्ये अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी हॉटेल व्यवसायिकांनी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.
बीडच्या प्रकरणात आम्ही कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री फडणवीस
बीडच्या संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपी वाल्मिक कराड याने मंगळवारी पोलिसांसमोर सरेंडर केले. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या प्रकरणात आम्ही कोणालाही सोडणार नाही असे म्हटले आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, 'ज्या ज्या प्रकरणात कुणी आढळेल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही. तपास गतिशील करण्यात आलेला आहे आणि त्यामुळंच त्यांना शरणागती पत्करावी लागलीय. जे आरोपी फरार त्यांना पकडायलाही टीम बनवली आहे.सर्वांना शोधून काढू'.
बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुणे सीआयडीला शरण आलाय.. त्याची पुणे सीआयडी कार्यालयात चौकशी केल्यानंतर सीआयडीचे अधिकारी वाल्मिकला घेऊन केजकडे रवाना झालेत. वाल्मिकला आजच सीआयडी केज कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे..
जगात सर्वात प्रथम न्यूझीलंडमध्ये नववर्षाचा जल्लोष
भारतात नवीन वर्षाचं आगमन होण्यासाठी अजून 7 ते 8 तास बाकी असताना न्यूझीलंडमध्ये नववर्षाला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडच्या प्रमाणवेळेनुसार तेथे 12 वाजून गेले असल्याने तेथे नववर्षाचा जल्लोष केला जात आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला माजी राष्ट्रपती रामनाथ कोवींद त्रिंबकेश्र्वराच्या चरणी
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला माजी राष्ट्रपती रामनाथ कोवींद दर्शनासाठी त्रिंबकेश्र्वराच्या चरणी पोहोचले असून येथे मंदिरात ते विधिवत पूजा करणार आहेत. विश्वस्त मंडळासह पोलिसांकडून कोविंद यांच्या दर्शनासाठी खास नियोजन करण्यात आले असून शिर्डी येथे साई मंदिरातील दर्शनानंतर कोविंद त्र्यंबक नगरीत दाखल होणार आहेत.
CID कडून वाल्मिक कराडच्या चौकशीला सुरुवात
CID चे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे आणि आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी वाल्मिक कराडच्या चौकशीला सुरुवात केली आहे. CID कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनात वाल्मीक कराड याची चौकशी केली जात असून 12 वाजून 5 मिनिटांनी वाल्मीक कराड हा पुण्यातील सीआयडी कार्यालयात दाखल झाला. त्याने पोलिसांसमोर सरेंडर केले.
वाल्मिकी कराडची प्रकृती बिघडल्याची माहिती
पुण्यामध्ये सीबीआयला शरण आल्यानंतर वाल्मिकी कराडची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. नातेवाईकांनी वाल्मिकीला काही औषधं दिली आहेत.
वाल्मिक कराडच्या अटकेनंतरही मस्साजोगचे गावकरी असमाधानी
वाल्मिक कराडच्या अटकेनंतर ही मस्साजोगचे गावकरी असमाधानी आहेत. सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी उद्या गावकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन करणार आहेत. वाल्मिक कराडची अटक म्हणजे नौटंकी असल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी नोंदवली आहे.
वाल्मिक कराड शरण आला
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणामध्ये मागील तीन आठवड्यांपासून सातत्याने चर्चेत असलेले अजित पवारांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मिक कराड पुण्यामध्ये सीआयडीला शरण आला आहे. याच प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मागील काही दिवसांपासून फरार होता. त्याने एक व्हिडीओ प्रदर्शित करुन आपण शरण येत असल्याची घोषणा केली. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...
जरांगेंना पाहताच संतोष देशमुखांचे बंधू रडू लागले अन्...
मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटी येथे आलेत. दोघांमध्ये चर्चा सुरू आहेत. धनंजय देशमुख यांना जरांगे यांच्या भेटीत अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. आरोपीला अटक केली नाही तर सगळं राज्य ढवळून काढू, असं म्हणत जरांगेंनी धनंजय देशमुख यांची समजूत घालत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
सुरेश धस घेणार CM फडणवीसांची भेट; मुंबईच्या दिशेने रवाना
भाजप आमदार सुरेश धस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. संतोष देशमुख प्रकरणात सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा धस यांचा आरोप आहे. 3 आठवडे उलटूनही वाल्मिक कराड अद्याप फरार आहे. तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नेमणूक करण्याचीही मागणी धस करणार आहेत. धस हे मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून आज दुपारी ते मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहेत.
थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी कंडोम वाटणाऱ्या पुण्यातील क्लबला पोलिसांचा दणका
पुण्यातील मुंढवा भागातील नामांकित पबमध्ये होणारी पार्टी अखेर रद्द करण्यात आली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये येणाऱ्या निमंत्रितांसाठी एका पबकडून कंडोम आणि ओआरएसचे पाकीट देण्यात आले होते. या संदर्भातली बातमी 'झी 24 तास'ने दिली होती. पुणे पोलिसांकडून या पबला काल नोटीस देण्यात आली होती. संबंधित पबने होणारी पार्टी अखेर रद्द केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली होती तसेच या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब सुद्धा नोंदवले होते.
नव्या वर्षात सहकारी संस्थांच्या निवडणुका
आधी लोकसभा निवडणूक, नंतर पावसाळा आणि विधानसभा नंतर निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे वर्षभर रखडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल नववर्षाच्या सुरुवातीला वाजणार आहे. राज्य सरकारने राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसह इतर सहकारी संस्थांच्या निवडणुकांना 31 डिसेंबर 2024 पर्यंत स्थगिती दिली होती. त्याची मुदत संपत असल्याने नव वर्षात बुधवार 1 जानेवारी 2025 पासून रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण प्रक्रिया सुरू करणार आहे.
वाशिममधील दूध डेअरीला आग; लाखोंचं नुकसान
वाशिमच्या रिसोड शहरातील पंचायत समितीजवळ असलेल्या दूध डेअरीला आज सकाळी साडेपाच वाजता भीषण आग लागली. या आगीत डेअरीमधील साठवलेला दूध, उपकरणे आणि इतर माल जळून खाक झाला, या आगीत लाखोंचं नुकसान झालं आहे. अग्निशमन विभागाने त्वरित घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली आगीच्या नियंत्रणात येण्यापूर्वीच डेअरीला मोठे नुकसान झाले होते. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पुणे विद्यापीठात आंदोलनांसाठी आठ दिवस आधी परवानगी बंधनकारक
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलनांसाठी आठ दिवस आधी परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, अहिल्यानगर उपकेंद्र आणि नाशिक उपकेंद्र येथे कोणत्याही स्वरूपाच्या सभा, बैठका, आंदोलने आणि तत्सम कार्यक्रम करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची किमान आठ दिवस आधी परवानगी घेणे आवश्यक करण्यात आले आहे. पूर्वपरवानगी न घेता सभा, बैठका, कार्यक्रम घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे जारी केलेल्या या निर्णयाविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
कोरेगाव भीमा अभिवादन कार्यक्रमानिमित्त पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठे बदल
उद्या होणाऱ्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीत आज दुपारी दोन वाजल्यापासून बदल करण्यात येणार आहेत. अभिवादन कार्यक्रमास राज्यभरातून अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित रहात असतात त्यामुळे पर्यायी मार्गाची व्यवस्था वाहतूक विभागाकडून करण्यात आली आहे. वाहतूक बदलाबाबतची माहिती देणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत.
> पुण्याकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी खराडी बाह्यवळण मार्गावरून वळून मुंढवा, मगरपट्टा चौक, पुणे-सोलापूर रस्ता, केडगाव नगर रस्त्याला लागावे. तर सोलापूर रस्त्याने आळंदी, चाकणकडे जाणाऱ्या वाहनांनी हडपसर, मगरपट्टा चौक, खराडी बाह्यवळण मार्गावरून विश्रांतवाडीकडे जावे.
> मुंबईकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे अहिल्यानगरकडे जावे.
> मुंबईहून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांनी वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे अहिल्यानगरकडे जावे.
ठाणे : येऊरच्या जंगलात ट्रेकिंगला गेलेल्या तरुणांवर मधमाशांचा हल्ला
ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर, या ठिकाणी दहा तरुण ट्रेकिंगसाठी गेले असता मधमाश्या चावल्याच्या भीतीने काही तरुण तेथेच अडकले होते. सदर घटनास्थळी डोंगरामध्ये अडकलेल्या मुलांची सुटका वर्तकनगर पोलीस स्थानकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून व टीडीआरएफ जवानांकडून सुखरूप केली आहे. सदर मुलांना त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले तसेच मधमाश्या चावून गंभीर दुखापत झालेल्या तिघांना क्रीटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
25 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याला अटक
25 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक अटक करण्यात आली आहे. पोलीस नाईक शेखर पाटणकर असे या कर्मचाऱ्याचं नाव आहे. एका बांधकामादरम्यान बाल कामगाराचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला होता. या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल न करण्यासाठी संबंधित बांधकाम ठेकेदाराकडे पोलीस कर्मचारी शेखर पाटणकर यांनी 50 हजारांची लाच मागितली होती. त्यामध्ये 25 हजारांची लाचेची रक्कम ठरली होती. या प्रकरणी सांगलीच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून पोलीस कर्मचारी शेखर पाटणकर याला अटक करण्यात आली आहे. याच पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचाऱ्याला काही दिवसांपूर्वी पंधरा हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ एक महिन्याच्या आत आणखी एक पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आल्याचा प्रकार घडल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
तळीरामांनो सावधान... दारु पिऊन गाडी चालवाल तर वर्षाचा पहिला दिवस तुरुंगात
सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो पर्यटक रायगड जिल्हयात येत असतात. अशावेळी कायदा सुव्यवस्थेची समस्या निर्माण होवू नये यासाठी रायगड पोलीसांनी कंबर कसली आहे. अवैध पाटर्या, ड्रग्जचा वापर आणि महिलांची छेडछाड रोखण्याबरोबरच दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे धोरण अवलंबले जाणार आहे. ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह रोखण्यासाठी जिल्हयाच्या विविध 18 ठिकाणी खास पथके तैनात करण्यात येणार आहेत. या पथकांकडे ब्रेथ अॅनालायझर असतील. ते वाहनचालकांची कसून तपासणी करतील. दारू पिऊन गाडी चालवत असेल तर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नववर्षात कोकण रेल्वेवरील विशेष रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ
विदर्भ, खानदेश, कोकण, गोवा यांना जोडणाऱ्या नागपूर – मडगाव विशेष रेल्वेगाडीच्या सेवेत वाढ करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेगाडीची सेवा 1 जानेवारीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. तर, या रेल्वेगाडीला सावंतवाडी रोड येथे अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतल्याने हजारो कोकणवासी प्रवाशांना दिलासा मिळेल.
संतोष देशमुख यांचा भाऊ घेणार पत्रकारपरिषद?
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू पत्रकारपरिषद घेण्याची शक्यता आहे. या प्रकरणात अनेकांची सीआयडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.
कायदा सुव्यवस्थेसंदर्भात 'सह्याद्री'वर बैठका
राज्याच्या कायदा सुव्यवस्थेबाबत 'सह्याद्री' अतिथीगृहावर सोमवारी रात्री बैठका पार पडल्या. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सह्याद्री अतिथीगृहावर घेतली बैठक. सीआयएसएफचे वरिष्ठ अधिकारीही सह्याद्रीवर हजर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा झाली.
क्षीरसागर यांनी घेतली फडणवीसांची भेट
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर असताना क्षीरसागर फडणवीसांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर दोन नेत्यांमध्ये भेट झाली.