Maharashtra Breaking News LIVE : उद्या मविआची संयुक्त पत्रकार परिषद, जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता

Thu, 17 Oct 2024-7:59 pm,

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: आजच्या दिवसभरात कोणत्या घडामोडींवर असणार विशेष लक्ष? पाहा सर्व घडामोडींच्या वेगवान अपडेट...

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्या क्षणापासून राजकीय गणितं आणि डावपेचांना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. येणारा प्रत्येक दिवस नवं काहीतरी दाखवून जात आहे. आजच्या दिवशी कोणत्या घडामोडींना असणार महत्त्वं? कोणत्या घडामोडी ठरणार गेम चेंजर? पाहा LIVE UPDATES... 


Latest Updates

  • उद्या मविआची संयुक्त पत्रकार परिषद, जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता 

    महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद उद्या शुक्रवार दुपारी 12 वाजता शिवालयात पार पडणार आहे. याच पत्रकार परिषदेत उद्या जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता असून कोण किती जागा लढणार याचा फॉर्म्यूला उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. नाना पटोले, जयंत पाटील आणि संजय राऊत पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

  • मंत्री तानाजी सावंतांच्या खाजगी सुरक्षा रक्षकाचा हलगर्जीपणा, रिव्हॉल्वरला धक्का लागल्याने घरातच गोळीबार

    मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या व्यक्तीच्या घरी कपाटात ठेवलेल्या रिव्हॉल्वरला धक्का लागल्याने घरातच गोळीबार झाला. पुण्यातील धनकवडीतील वनराई कॉलनी भागात ही घटना घडली असून या घटनेत सुरक्षा रक्षक यांचा 13 वर्षीय शाळकरी मुलगा जखमी झाला आहे. याप्रकरणी त्याचे वडील निवृत्त जवान नितीन हनुमंत शिर्के यांच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

  • मुंबई जिंकता येत नसल्यानं मुंबई अदानींच्या घशात घातली जातेय - आदित्य ठाकरे 

    मुंबईत आमदार आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. यात त्यांनी विरोधकांवर आरोप केला की मुंबई जिंकता येत नसल्यानं मुंबई अदानींच्या घशात घातली जातेय. ते पुढे म्हणाले, 'पालिकेची कॉफर्ड मार्केटमधील शिवाजी महाराज मंडई, वरळीतील अस्फाल्ट प्लांट आणि मलबार हिलमधील पॉवर स्टेशनची जागा लिलावात काढली जातेय.आम्ही पालिकेत असताना 92 हजार कोटींच्या मुदतठेवी वाढवल्या. परंतु आता पालिका दीड ते दोन लाख तुटीत गेली आहे. पालिकेच्या जागांचा लिलाव सुरू केलाय'.

    'भाजपवाले आणि शिंदे हुतात्मा स्मारकही लिलावात काढतील. पालिका विकण्याचे काम सुरू आहे. लिलावाचा अधिकार यांना दिला कुणी... आचारसंहितेत कुणाला काय परवानगी आहे ते निवडणूक आयोगाने सांगावे. अनेक ठिकाणी पोस्टर आहेत. रेल्वेत जाहीराती सुरू आहेत. माझा लढा हा महाराष्ट्राची लूट करणा-यांविरोधात आहे', असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले. 

  • विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी उद्या जाहीर होणार

    विधानसभा निवडणुकांसाठी भाजपची पहिली उमेदवार यादी उद्या शुक्रवारी जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत नाव अपेक्षित असलेल्या उमेदवारांना प्रदेश कार्यालयाकडून सूचना देण्यात आल्या असून उमेदवारांना निवडणुकीसाठी कागदपत्रे जमा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत 100 पेक्षा अधिक जणांचा समावेश असण्याची शक्यता आहे. 

  • रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल, बुकींग कालावधी केला कमी 

    रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले असून बुकींग कालावधी कमी करण्यात आला आहे. आता दोन महिन्याआधीच आरक्षण करता येणार असून रेल्वेचा हा नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे. यापूर्वी चार महिन्याआधी तिकीट बूकींग करता येऊ शकत होतं. ज्यांनी 1 नोव्हेंबरपूर्वी बुकिंग केलंय त्यांचे आरक्षण कायम राहणार आहे. प्रवासी 31 ऑक्टोबरपर्यंत 120 दिवसांच्या आत प्रवासासाठी आरक्षण करू शकतात, परंतु त्यानंतर नवीन नियम लागू होईल.

  • ठाकरे गटातून पहिली उमेदवारी जाहीर, वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाईंचे नाव निश्चित

    विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकला जाहीर होणार आहेत. ठाकरे गटाकडून विधानसभेसाठी पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली असून शिवसेना नेते अनिल परब यांनी वांद्रे पूर्वमधून वरूण सरदेसाईंचे नाव निश्चित झाल्याची माहिती दिली आहे. बुधवारी गटप्रमुखांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्यांनी वरूण सरदेसाईंचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले. 

  • लाडकी बहीण किंवा नारी सन्मान योजना ही आमचीच योजना आहे- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

    जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षाची चर्चा सुरु आहे, जेव्हा ती चर्चा संपेल तेव्हा आम्ही अधिकृतपणे घोषणा करू. लाडकी बहीण किंवा नारी सन्मान योजना ही आमचीच योजना आहे, कर्नाटकाच्या झालेल्या निवडणूकीत आम्ही 2000 रुपये देण्याच जाहीर केलं होतं. आमचं सरकार आल आम्ही देतोय तेलणगांत सुध्दा आम्ही देतोयच, त्यामुळे महायुतीने जरी 1500 दिले नसते तरी आम्ही करणारच होतो आता 2000 केलं पाहिजे, असं आम्हाला वाटतंय यांनी कंजूशी का केली 1500 का दिल मला माहिती नाही असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 

  • सिडकोच्या भूखंड विक्रीला अल्प प्रतिसाद , जाहीर गृहप्रकल्पमद्ये शिल्लक घरांचा समावेश

    सिडकोने माझे पसंतीचे घर या योजनेअंतर्गत 26 हजार घरे विक्री साठी  उपलब्ध करून दिली आहेत, या घराची ऑन लाईन नोंदणी ला  चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी  ही घरे विकण्यासाठी  सिडकोला मेहनत घ्यावी लागणार आहे ,26  हजार घरांमद्ये 13 हजार घरे आर्थिक दुर्बळ घटकांसाठी आणि 13 हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत ,यातील 50 टक्के घरे एकट्या तळोजात आहेत. तसेच खांदेश्वर ,खारकोपर, बामणडोंगरी , मानसरोवर येथील काही  शिल्लक घरांचा समावेश आहे , तसेच या घराच्या किमती सिडको ने जाहीर केल्या नाही आहेत , त्यामुळे  किंमती कळल्यानंतर ग्राहकांची पसंती कळणार आहे, सिडको च्या घरांप्रमाणे सिडको च्या भूखंड खरेदी कडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे , नुकत्याच जाहीर झालेल्या 47 व्यावसायिक आणि रहिवासी भूखंड विक्री मद्ये फक्त 15 भूखंडांना नागरिकांनी प्रतिसाद दिला. 

  • महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार

    सोलापुरात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे.. MIM सोलापूर शहरातील चार विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहेत. सोलापुरातील मुस्लीमबहुल मतदारसंघात MIM मैदानात उतरणार आहे. सोलापूर शहर उत्तर, मध्य आणि दक्षिण सोलापूर तसंच अक्कलकोटमध्ये MIM उमेदवार उभे करणार आहे.. यातील सोलापूर शहर मध्यमधून शहराध्यक्ष फारूक शाब्दि यांची उमेदवारी घोषित करण्यात आलीये. तर इतर तीन मतदारसंघातील उमेदवारांची लवकरच घोषणा केली जाणार आहे. 

  • CAA संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल 

    CAA कायदा वैध असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायालयाच्या या निकालानुसार 1 जानेवारी 1966 ते 25 मार्च 1971 दरम्यान बांगलादेशातून आलेल्या अप्रवासी नागरिकांना भारतीय नागरिकत्वं मिळू शकतं. ज्यांना या कायद्याअंतर्गत नागरिकत्वं मिळालं आहे त्यांचा हा हक्क अबाधित राहणार आहे. 

     

  • समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात? 

    सूत्रांच्या माहितीनुसार समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून, शिंदे गटाच्या वतीनं ते निवडणूक लढणार असल्याचं म्हटलं जात आहे. धारावी मतदारसंघातून मुंबई कांग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या बहिणीचं त्यांना आव्हान असेल. 

     

  • सरकारचे निर्णय वादाच्या भोवऱ्यात? 

    आचारसंहितेपूर्वी सरकारने घेतलेले निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यताय. सरकारनं आचारसंहिता लागल्यानंतर काही निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय..त्यामुळे सरकारनं आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यता आलाय. 

  • बोगस मतदान कार्ड प्रकरणी 40 जणांवर गुन्हा 

    धाराशिवच्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदान कार्ड प्रकरणी 40 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला गुन्हा दाखल करण्यात आला. धाराशिव येथील सायबर पोलिसात झाला गुन्हा नोंद, अधिक तपासासाठी हे प्रकरण तुळजापूर पोलिसांकडे करण्यात आला वर्ग. बोगस आधार कार्ड, रहिवासी दाखले, मोबाईल नंबर, फोटो व इतर कागदपत्रे वापरून निवडणुक आयोगाचा 6 नंबर फॉर्म भरून मतदारांची करण्यात आली होती नोंदणी. 

     

  • बाहेरच्या पक्षातील लोकांना घेण्याचा आमचा उद्देश नाही आमच्याकडे तरुण चेहरे आहेत- जयंत पाटील

    शरद पवार तुमच्यावर मोठी जबाबदारी देणार असल्याचे सांगत आहे याबाबत बोलताना जयंत पाटील यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी आहेच जास्तीत जास्त विधानसभेला जागा निवडून आणायचा आहेत.त्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करतो आहे.किती जागा मागितल्या या प्रश्नाला बगल देत तुम्हाला सांगण्या पेक्षा मित्र पक्षांना सांगतो अशी टिप्पणी केली. बाहेरच्या पक्षातील लोकांना घेण्याचा आमचा उद्देश नाही.आमच्या कडे तरुण चेहरे आहेत.मुख्यमंत्री चेहरा जाहीर करावा असं उध्दव ठाकरे यांचा आग्रह आहे पण याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहे.

     

  • तेच गडी, तेच राज्य... नवी निवडणूक; पुण्यात काँग्रेसची नवी खेळी

    पुण्यात तीनही विद्यमान आमदारांना काँग्रेस पुन्हा उमेदवारी देणार असल्याची महिती सुत्रांनी दिली आहे. भोरमधून संग्राम थोपटे, पुरंदरमधून संजय जगताप आणि कसबा पेठमधून रविंद्र धंगेकर यांची नावं निश्चित असल्याची माहिती. शहरातील कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर या मतदारसंघावरही काँग्रेसचा दावा. कँन्टोन्मेंटमधून रमेश बागवे आणि शिवाजीनगरमधून दत्ता बहिरट यांच्या नावाची चर्चा. 

  • बीडीडी चाळीतील रहिवाशांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार 

    मुंबईतल्या वरळी इथल्या बीडीडी चाळ रहिवाशांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. बी.डी.डी. चाळ क्रमांक 1 ते 7 मधील रहिवाशांनी महाराष्ट्र शासन आणि म्हाडाच्या घरकुल वितरणावर नाराजी व्यक्त करत  निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.  रहिवाश्यानी ठिकठिकाणी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार असे बॅनर लावले आहेत. इतकंच नाही तर कोणत्याही राजकीय पक्षाला मतं मागण्यासाठी इमारतीत येऊ नये, असा कडक इशारा दिला आहे. 

  • भाजपनं सुजय विखेंना उमेदवारी नाकारली? 

    अहमदनगरच्या संगमनेर विधानसभा मतदार संघातून माजी खासदार सुजय विखे पाटील निवडणूक लढवणार नाहीत. पक्षाकडे सुजय विखे यांनी निवडणूक लढवण्यासाठी तयारी दाखवली होती. पण पक्षाकडून सुजय यांच्या नावाचा उमेदवारीसाठी विचार झाला नसून, ती जागा महायुतीत शिवसेनेकडे असल्याने उमेदवार कोण याची चर्चा आता सुरू आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सुजय विखे यांनी निवडणुकीची तयारी केली होती, पण एकाच घरात 2 तिकीट नको म्हणून पक्षानं हा निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. 

  • धनंजय मुंडे यांच्या पत्नीचा भीषण अपघात 

    पुणे सोलापुर महामार्गावर सोरतापवाडी येथे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीचा भीषण अपघात झाला. कार आणि ट्रॅव्हल्स बस यांच्यात जोरदार धडक होऊन हा झाला अपघात. अपघातात राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या. गुरुवारी पहाटे 4.30 वाजता अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. 

  • आता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी....

    मार्च 2025 मध्ये होणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलं नाहीए. असं स्पष्टीकरण राज्य शिक्षण मंडळाने केलंय. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांची समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झालेली वेळापत्रकं ग्राह्य धरू नयेत असं आवाहनही करण्यात आलंय. राज्य मंडळाचे बोधचिन्ह, नावाचा वापर करून परीक्षेबाबत चुकीची माहिती प्रसारित करून पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आलाय. 

  • पुणे- मुंबई एक्सप्रेस हायवेवर औढे गावाच्या हद्दीत अपघात

    पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर औढे गावाच्या हद्दीत अपघात.. पुण्याकडून मुंबई कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल बसचा अपघात.. अपघातात 15 जण गंभीर जखमी तर 10 जण किरकोळ जखमी. जखमींवर सोमाटने फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. ट्रॅव्हल बसने अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिल्याने अपघात.

  • विधानसभेच्या निवडणुकीसाठी उरले 3 दिवस

    पालिका आयुक्तांकडे मुंबई उपनगर व मुंबई शहर या दोन्ही जिल्ह्यांसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी बुधवारी पालिका मुख्यालयात बैठक घेत मतदानाच्या प्रक्रियेसंदर्भात माहिती दिली. मुंबई शहर व उपनगरात मिळून एक कोटीहून अधिक नोंदणीकृत मतदार आहेत.

  • उदयनराजे- शिवेंद्रराजे यांच्यामध्ये बैठक

    खासदार उदयनराजे आणि त्यांचे बंधू शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावलीये. साता-यात ही बैठक पार पडणारेय. विधानसभा आणि जिल्ह्यातील भाजप पक्षाच्या निवडणूक कार्यक्रमाची बैठकीत चर्चा होणारेय.

     

  • आज भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

    आज भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता. विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीत दिग्गज नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता. पुढील काही तासात भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता. हरियाणाचे मुख्यमंत्र्यांचा चंदीगडमध्ये शपथविधी पार पडणार आहे या शपथविधी सोहळ्यानंत अमित शाहांसोबत शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत अमित शाहांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार आहे. 

  • मविआचं जागावाटपाचं सूत्र ठरलं 

    महाविकास आघाडीचं विधानसभेसाठी मुंबईतील जागावाटपाचं सूत्रही ठरल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळालीये. ठाकरे पक्षाला मुंबईमध्ये सर्वाधिक 18 जागा मिळणार, काँग्रेसला 14, शरद पवार पक्षाला 2, समाजवादी पक्षाला 1 अशा पद्धतीने जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तर आज  महाविकास आघाडीची मुंबई बैठक  होणार आहे. विधानसभेच्या जागांबाबत आज पुन्हा एकदा चर्चा होणार असून आजची बैठक ही अंतिम असण्याची माहिती आहे.

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link