Maratha Reservation LIVE: आरक्षण मिळाल्याशिवाय पाण्याला हात लावणार नाही; मनोज जरांगे यांचा निर्धार

Wed, 01 Nov 2023-7:25 pm,

Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु असणारी शक्तिप्रदर्शनं आता आणखी ज्वलंत झाली असून, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे.

Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शासनानं निर्णय घेतला नाही तर, आपण बुधवारपासून पाणीही पिणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण द्यावं, शासनानं काहीही करावं पण, आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा. असं न केल्यास आपण पाण्याचा थेंबही घेणार नसून होणाऱ्या परिणामांना शासनच जबाबदार असेल असं ते म्हणाले. 

Latest Updates

  • आरक्षण मिळाल्याशिवाय पाण्याला हात लावणार नाही असा निर्धार मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. पाणी त्याग करत असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली. यामुळे येत्या काळात मनोज जरांगे यांचे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे.  

  • Maratha Reservation LIVE: पूर्णा तहसील पेटवून देण्याचा प्रयत्न, अज्ञाताने लावली आग

    परभणीचे पूर्णा तहसील आज बारा वाजताच्या सुमारास कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न झालाय. तहसील कार्यालयालाच पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न झालाय. मात्र तिथे असलेल्या अग्निशमन दलाने काही वेळातच आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठी घटना टळली.

  • Maratha Reservation LIVE: सोलापूर - सोलापुरात मराठा क्रांती मोर्चा पुन्हा आक्रमक,  सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळत वाहतूक पाडली बंद. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पाळे पुलाजवळ टायर जाळत महामार्ग रोखला. कालच्या रेल रोको आंदोलना नंतर आज पुन्हा टायर जाळत सरकारचा निषेध

  • Maratha Reservation LIVE: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानाबाहेर सुरक्षा वाढवली

    मराठा आरक्षण संदर्भात राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खाजगी निवासस्थानासमोर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. धरमपेठ परिसरातील त्रिकोणी पार्कजवळ देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी निवासस्थान आहे. एरवी फडणवीस नागपुरात असताना त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असतो. मात्र, सध्या उपमुख्यमंत्री फडणवीस नागपुरात नसताना सुद्धा घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

  • Maratha Reservation LIVE: मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील गंगावळण या ठिकाणी भीमा नदी पात्रात सकल मराठा समाजाच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात येतयं. एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणा देत मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दर्शवण्यात येत आहे.

  • Maratha Reservation LIVE: सूत्रांच्या माहितीनुसार धाराशिव धाराशिव जिल्ह्यात लागू केलेली संचारबंदी दुपारनंतर उठवली जाणार. जिल्ह्यात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर लागू करण्यात आली होती. पण, आता मात्र ही संचारबंदी उठवली जाण्याची चिन्हं आहेत. 

     

  • Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणासाठी आंदोलक अजूनही आक्रमक आहेत. सिल्लोड तालुक्यत भराडी गावात आंदोलकांनी अब्दुल सत्तार यांच्या फोटोचे दहन केले आणि जोरदार घोषणाबाजी केली. मंगळवारीसुद्धा अब्दुल सत्तार यांच्या मुलाची गाडी आंदोलकांनी अडवली होती. तसेच सत्तार यांनी विकास कामाचे जे फलक लावले होते ते उखडून टाकले होते.

  • Maratha Reservation LIVE: मुंबईत मंत्रालयाबाहेर मराठा आमदारांनी सरकारविरोधी आंदोलन केलं आणि पोलिसांनी इथं येत या आंदोलकांना ताब्यात घेतलं. ज्यानंतर या भागात एकच नाट्य पाहायला मिळालं. 

     

  • Maratha Reservation LIVE: पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 40 जणांना घेतले ताब्यात

    रास्तारोको दरम्यान पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 40 जणांना नांदेड पोलीसांनी अटक केलीये. दगडफेकीत नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हाताला दगड लागून ते जखमी झाले होते. नांदेड हैद्राबाद रोडवर कुष्णुर येथे काल रास्तारोको करण्यात येत होता. या ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. घटना कळाल्यानंतर पोलीस अधीक्षक कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अबिणाशकुमार पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले होते. वाद वाढून अचानक दगडफेक सुरू झाली होती. पोलीसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी कलम 353, दगडफेक, दंगा भडकवने आदी कलमान्वये गुन्हे दाखल करून 40 जणांना अटक केलीये. दरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांचा आहे. यात एक आंदोलक जखमी झालाय.

  • Maratha Reservation LIVE: रास्तारोको दरम्यान पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 40 जणांना नांदेड पोलीसांनी अटक केलीये. दगडफेकीत नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हाताला दगड लागून ते जखमी झाले होते. नांदेड हैद्राबाद रोडवर कुष्णुर येथे काल रास्तारोको करण्यात येत होता. या ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती. ज्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

  • Maratha Reservation LIVE: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देहूत मनोज जरांगे पाटील यांना शांततेच्या मार्गाने पाठिंबा दर्शविण्यासाठी सकल मराठा समाज देहू ग्रामस्थांनी मशाल मोर्चा काढला..छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेला मशाल मोर्चा देहू कमान तसेच संपूर्ण देहू गावात वळसा घालण्यात आला यावेळी एक मराठा लाख मराठा या जयघोषाने देहूनगरी दुमदूमली.

     

  • Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आता आमदारांनी सहभाग घेतला आहे. एकीकडे जरांगे पाटील यांनी विशेष अधिवेशनाची मागणी केलेली असताना दुसरीकडे आमदारांनीच मंत्रालयाला टाळं ठोकलं आहे. मंत्रालयाबाहेर आमदारांनी आंदोलन सुरु केलं आहे.

  • Maratha Reservation LIVE: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाची सुरक्षा वाढविली

    कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी आमदार नीवासासमोर आज सकाळी फोडण्यात आली. त्यानंतर मंत्रालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस दल,मुंबई पोलिस त्याच बरोबर साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले आहे.वरिष्ठ पोलीस अधिकारीही निषेध लक्ष ठेऊन आहे.

  • Maratha Reservation LIVE: तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई नको, मी सुखरुप आहे. चिंता नसावी. आमदार निवासात उभी असणारी कार फोडली, त्यावेळी कारमध्ये कोणीही नव्हतं. मी सुरुवातीपासूनच मराठा समाजासोबत होतो आणि यापुढंही राहीन अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. शिवाय मराठा समाजाच्या आंदोलनाला अशा घटनांमुळे गालबोट लागतंय असंही सूचक वक्तव्य त्यांनी केलं. 

     

  • Maratha Reservation LIVE: आकाशवाणीजवळ  या ठिकाणी हसनमुश्रीफ यांची गाड्यांची तोडफोड केल्यानंतर मुंबईतल्या विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे . 

     

  • Maratha Reservation LIVE: बीडमधील संचारबंदी मागे घेवून जमावबंदी लागू केल्याने आता इथं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येवू लागले आहे. परंतु इंटरनेट सुविधा अद्यापही बंद ठेवण्यात आली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी 

     

  • Maratha Reservation LIVE: आकाशवाणी आमदार निवासाजवळ मराठा आंदोलकांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. फोडलेल्या गाड्या मरिन लाईन्स पोलीस स्टेशनकडे रवाना करण्यात आल्या आहेत. या गाड्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Maratha Reservation LIVE:  मावळ मध्ये आता जरांगे पाटील यांना वाढता पाठिंबा दिसून येत आहे. मावळ मधील नागाथली गावात देखील संध्याकाळी मशाल आणि कॅडल मोर्चा काढण्यात आला. यावेळी गावातील लहान मुलांसह महिला आणि वृद्ध यांनी देखील मोठा सहभाग घेतला. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी आता मावळ मधील गावागावांत मशाल मोर्चे निघू लागले आहेत.

  • Maratha Reservation LIVE: कसे मिळणार कुणबी प्रमाण? पाहा... 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    कुणबीप्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे

    • कुणबी प्रमाणपत्र देताना १९६७ पूर्वीचे महसुली पुरावे ग्राह्य.

    • गाव नमुना क्रमांक १४मध्ये जन्म-मृत्यूची नोंद आढळून येते.

    • एखाद्याचा जन्म किंवा मृत्यू कुणबी म्हणून नोंद असेल, तर त्यांनाच प्रमाणपत्र.

    • शाळा सोडल्याचा दाखला; तसेच जुन्या फेरफारमधील नोंदीत एका कुणब्याने दुसऱ्या कुणब्याला जमीन विक्री केल्याचा उल्लेख असल्यास प्रमाणपत्र.

    • सातबारा उताऱ्यात उतरंडीनुसार कुणबी वंशावळ असल्यासही मिळणार प्रमाणपत्र.

     

  • Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणासाठी पुणे नगर महामार्गावर कँडल मार्च मोर्चा

    मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या सणसवाडी येथे मराठा बांधवांनी कॅण्डल मार्च मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी केली, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही यावेळी मराठा बांधवांनी सरकारला दिला.

  • Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आज पुणे मार्केट यार्ड बंद

    मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आज पुण्याच्या मार्केट यार्डातील भाजीपाला बाजार, फुल बाजार तसेच फळ बाजार बंद आहे. त्याचप्रमाणे महात्मा फुले मंडईत देखील बंद पाळण्यात येत आहे. मार्केट यार्ड मधील व्यापारी तसेच आडतदारांनी हा बंद पुकारला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला विविध माध्यमातून पाठिंबा मिळत आहे. पुण्यातील शेतमाल व्यापारी तसेच शेतकरी देखील त्यात सहभागी झाले आहेत.

  • Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणासाठी थाळी वाजवत आंदोलन करत सरकारचा निषेध

    पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी ग्रामस्थांनी मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने अनोख्या पध्दतीने आंदोलन करत सरकारचा निषेध केला ,कोरोणा काळात पंतप्रधानांनी गो कोरोणा गो ह्या साठी थाळी बजाव उपक्रम राबविला होता त्याच अनुषंगाने गावडेवाडी येथील ग्रामस्थांनी थाली बजाव सरकार हटाव अशा घोषणा देत गावांमध्ये थाळी वाजवत महिलांनी आरक्षणाची मागणी केली.

  • Maratha Reservation LIVE: सर्वपक्षीय बैठकीत ठाकरे गटाला वगळल्यानं वाद निर्माण झालाय. सर्वपक्षीय बैठकीचं शिवसेना ठाकरे गटाला निमंत्रण मिळालेलं नसल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. एक आमदार असलेल्यांना निमंत्रण, पण शिवसेनेला नाही अशी टीका राऊतांनी केलीय. 

     

  • Maratha Reservation LIVE: कुणबी पुरावे असलेल्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठीचा राज्य सरकारकडून जीआर. मंत्रिमंडळ बैठकीत न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल.

  • Maratha Reservation LIVE: राज्य सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने आज सर्व पक्षीय बैठक बोलावलीये. सकाळी साडे दहा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर होणा-या या बैठकीला शरद पवार हजर राहणार आहेत.

     

  • Maratha Reservation LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलवलेल्या सर्व पक्षीय बैठकीत आरक्षणाबाबत विविध पक्षांची आरक्षणाबाबत मतं जाणून घेतली जाणार आहेत. 

     

  • Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शासनानं निर्णय घेतला नाही तर, आपण बुधवारपासून पाणीही पिणार नसल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण द्यावं, शासनानं काहीही करावं पण, आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा. असं न केल्यास आपण पाण्याचा थेंबही घेणार नसून होणाऱ्या परिणामांना शासनच जबाबदार असेल असं ते म्हणाले. 

     

  • Maratha Reservation LIVE: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु असणारी शक्तिप्रदर्शनं आता आणखी ज्वलंत झाली असून, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link