बारामती, पुणे : राज्यात कोरोनाची ( Coronavirus in Maharashtra) दुसरी लाट ओसल्याने अनलॉक (Unlock) जाहीर करण्यात आला. पाच लेव्हलमध्ये अनलॉक जाहीर करण्यात आला. मात्र, आता एक चिंताजनक माहिती पुढे आली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आता बारामतीमधील ( Baramati) काटेवाडी गावात सात दिवसांसाठी लॉकडाऊन  (Lockdown) जाहीर करण्यात आलाय. गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं गावकऱ्यांनी एकत्र येत सात दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुढील 7 दिवस गाव शंभर टक्के बंद राहणार आहे. दोन दिवसापूर्वी गावांमध्ये अँटीजेन कॅम्प घेतला होता त्यावेळी 27 रुग्ण आढळल्याने निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. (Lockdown announced for seven days in Katewadi village in Baramati)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, दुसऱ्या लाटेनंतर आता राज्यावर डेल्टा प्लसचं संकट घोंगावू लागलंय. त्यामुळे राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनं सरकारी स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटनं सर्वानाच धडकी भरवलीय. डेल्टा प्लसच्या रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतेय. अशातच अनलॉकमुळे गर्दी वाढू लागल्यानं संसर्गाचा धोकाही वाढला आहे. पुन्हा रुग्ण संख्या दहा हजारांच्या घरात गेली आहे. त्यामुळे राज्यावर पुन्हा एकदा लॉकाडाऊनची वेळ आलीय. निर्बंध कडक करण्यासदंर्भात सरकारी स्तरावर हालचालीही सुरू झाल्या आहेत. 


तिसऱ्या लाटेच्या धर्तीवर निर्बंधांबाबत लागू असलेले निकष अधिक कठोर करण्यात येतील. गर्दी टाळण्यासाठी कडक नियमावली करण्यात येईल. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत याबाबतची नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


डेल्टा व्हायरसची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता राज्याची आरोग्य यंत्रणाही तयारीला लागलीय. ऑक्सिजन बेड वाढवण्यासोबत डेल्टा प्लसच्या रुग्णांसाठी वेगळा विभाग तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी गाफील राहू नका. कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट अत्यंत घातक आहे. आतापर्यंत आपण बराच संयम पाळलाय आता ही लढाई अखेरच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्या.