उस्मानाबाद : कोरोनाचे संकट कामय आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांना आता दणका देण्यात येत आहे. याची सुरुवात शहरातील आठ दुकानदारांपासून झाली आहे. वारंवार सूचना देऊन आणि सांगूनही नियमाचे आणि कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आठ दारु विक्री करणाऱ्या दुकानांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊन व जनता कर्फ्यु असताना ही दारूची दुकाने उघडी ठेवून मद्य विक्री करणाऱ्या आठ बिअरबार आणि परमिट रुमचे परवाने जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी कायमस्वरुपी रद्द केले आहेत. मद्याच्या पासेसच्या नोंदी न ठेवणे,परराज्यातील व गोवा निर्मित मद्य विक्री करणे शासनाच्या नियमांचे व अटींचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. 


उस्मानाबाद तालुक्यातील घोगरेवाडी येथील हॉटेल पृथ्वीराज बिअरबार , ढोकी येथील हॉटेल शिरीन व सूर्या बिअरबार, कळंब तालुक्यातील शिराढोण येथील हॉटेल भक्ती बिअर बार, उमरगा तालुक्यातील डिग्गीरोड येथील हॉटेल प्राची, भूम येथील हॉटेल सचिन बार आणि लोहार येथील जट्टे बिअर शॉपीचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिली.


उस्मानाबाद जिल्ह्यात यापुढे जे बार व परमिट चालक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर अशाच स्वरूपाची कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक केशव राऊत यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी यांनीही कारवाई केल्याने बार चालकांचा चांगलाच धसका बसला आहे.