सावधान ! नियम पाळले नाहीत तर राज्यातही लॉकडाऊन?
लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे.
अमर काणे, नागपूर : लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळेच अकोला, अमरावती, यवतमाळमध्ये लॉकडाऊनचा निर्णय झाला आहे. आपल्या शहरात, जिल्ह्यात अशी वेळ येऊ नये म्हणून सगळ्यांनीच खबरदारी घेतली पाहिजे.
लॉकडाऊनमध्ये शिथीलता, तापमानात घट, ग्रामपंचायती निवडणुकीचा धुराळा, लग्नसराई या सर्व घटकांमुळे कोरोना रुग्णांची संख्याही वाढू लागली. नियम पाळण्याची बेफिकीरी आता सर्वांनाच भोवते आहे. अकोला, अमरावती, यवतमाळमध्ये लॉकडाऊन लावण्याचा निर्णय झालाय. अकोल्यात 28 फेब्रुवारी पर्यंत नवीन नियमावली तयार करण्यात आली होती...मात्र तीन दिवसातच बधितांचा आकडा 500 वर गेल्याने संपूर्ण लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. लग्न समारंभासाठी पूर्व परवानगी आवश्यक असून 50 लोकांपेक्षा अधिक लोकांना जमता येणार नाही. हॉटेल्समध्ये मास्क , सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे.
अमरावती, यवतमाळमध्येही कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. कोरोना पॉझिटीव्ह रेटमध्ये वर्धाही राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर वर्ध्यातही जमावबंदीचा आदेश आहे. कोरोनानं पुन्हा डोकं वर काढताच नागपूरमध्येही आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.
२०२० मधील कोरोनाकाळातील कडक लॉकडाऊनची झळ सर्वस्तरातील नागरिकांना बसली आहे. कोरोनाच्या वेदना हजारो नागरिकांनी अनुभवल्या आहेत. पुन्हा अशी स्थिती राज्यात नको असल्यास कोरोनाचे नियम पाळणे याशिवाय दुसरा मार्ग नाही.