प्रणव पोळेकर झी मीडिया, रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात विरह सहन न झाल्यानं मुंबईतल्या एका प्रेमवीरानं चक्क चालतच सिंधुदुर्ग गाठलं आणि  आपल्या प्रेयसीला भेटला... एखाद्या चित्रपटाला शोभावं अशा या कथानकात पोलिसांना प्रवेश झाला आणि दोघांच्या नशीबी पुन्हा एकदा  विरह आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ लीजे
इक आग का दरिया है और डूब के जाना है


प्रेमात कधी कधी अग्नीची नदी देखील बुडून पार करावी लागते असं शायर म्हणतो ते खोटं नव्हे. याचं अगदी तंतोतंत उदाहरण कोकणात बघायला मिळालंय. आपल्या प्रेयसी भेटण्यासाठी लॉकडाऊनच्या बंधनांना भेदून मुंबईतून प्रियकर कोकणात आला आणि प्रेमासाठी काय पण हे दाखवून दिलं.....चालत, मिळेत ते वाहन पकडत, चौकी पहारे चुकवत मुंबईतला हा प्रेमवीर प्रेयसीच्या कोकणातल्या गावी पोहोचला आणि आपल्या प्रेयसीला भेटला सुद्धा...त्यानंतर त्यानं गावच्या शाळेत एक रात्र काढली आणि दुसऱ्या दिवशी तो आपल्या प्रेयसीला घेवून मुंबईला निघाला


मुळची सिंधुदुर्गातील असलेली भाग्यश्री आणि रामचंद्र मागील एक वर्षापासून एकत्रच राहतायत....लवकरच दोघं लग्न देखील करणार होते....पण, लॉकडाऊनची घोषणा झाली आणि प्लॅनिंगवर पाणी फिरलं.....शिमग्याकरता कोकणात आलेली भाग्यश्री आपल्या गावीच अडकून पडली...आणि जास्त काळ भाग्यश्रीपासून लांब राहणं सहन न झाल्यानं रामचंद्र तिला आणण्याकरता थेट तिच्या गावी पोहोचला.


गावसोडून दोघांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा देखील  सुरक्षीतपणे पार केली. पण, लांजामध्ये शिवभोजन थाळीचा आस्वाद घेण्यासाठी थांबलेल्या या दोघांवर पोलिसांची नजर पडली आणि मग चौकशीअंती सारी कहाणी उघड झाली दरम्यान, या दोघांना सिंधुदुर्गात पाठवण्यासंदर्भात तिथल्या प्रशासनाशी देखील बोलणी करण्यात आली. पण, रामचंद्र रेडझोनमधून आल्यानं त्याला परत घेण्यास सिंधुदुर्ग प्रशासनानं नकार दिला.... सध्या दोघांना लांजा इथं क्वारंटाईन करण्यात आलंय.


लॉकडाऊनमुळे विरह सहन करत असल्यामुळे अनेक प्रेमी जोडप्यांची अवस्था मात्र मधू इथे आणि चंद्र तिथे अशीच अवस्था झाली आहे...त्यामुळे प्रेमसाठी कायपण करणाऱ्या या दोघांची चर्चा अख्या कोकणात सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.