लॉकडाऊन : घरी परतण्यासाठी जीव धोक्यात घालून होडीतून प्रवास
उजनी धरणाच्या बॅक वॉटरमधून पुणे जिल्ह्यातील लोकांनी होडीतून जीव धोक्यात घालून करमाळ्यात प्रवास केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
सोलापूर : कोरोना विषाणू रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. तसेच संचारबंदी आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहे. मात्र लाॅकडाऊन असतानाही घरी परतण्यासाठी अनेक जण नवनवीन उपाय शोधत आहेत. उजनी धरणाच्या बॅक वॉटरमधून पुणे जिल्ह्यातील लोकांनी होडीतून जीव धोक्यात घालून करमाळ्यात प्रवास केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
लाॅकडाऊनमुळे जिल्हाबंदीचे कडक नियोजन सुरु आहे. पुणे जिल्ह्यातून करमाळ्यात येणारे रस्ते बंद आहेत. अशातच करमाळा तालुका हद्दीपासून सहा किलोमीटर अंतरावरील भिगवण स्टेशन येथे कोरोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे कोरोनाची चिंता कायम आहे. असे असताना नागरिकांनी आहे तिथेच राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
मात्र, याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. आपला जीव धोक्यात घालून होडीतून प्रवास करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मच्छीमार बोटीतून जीव धोक्यात घालत पुणे जिल्ह्यातील लोक पहाटे आणि संध्याकाळी करमाळा तालुक्यातील बॅक वाॅटर परिसरातील गावात येत आहेत. सध्या मासेमारी बंद आहे. मात्र, काही मासेमारी करणारे काहीशा रुपयांच्या आमिषापोटी धोका पत्करत आहेत.