लोकसभा निवडणूक २०१९: बारामतीचं `मैदान`! पवार-फडणवीस आमने-सामने
सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघात अखेरच्या दिवशी दोन्ही पक्षांनी प्रचारासाठी जोर लावला.
बारमती : सगळ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती मतदारसंघात अखेरच्या दिवशी दोन्ही पक्षांनी प्रचारासाठी जोर लावला. भाजपा उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी इंदापुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. यावेळी त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. तर बारामतीच्या प्रचार सांगता सभेमध्ये शरद पवारांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली. पाच वर्षांत मोदींनी काय केलं, असा सवाल त्यांनी केला.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
'राष्ट्रवादीच्या कॅप्टननी पॅड बांधले, डोक्याला हेल्मेट लावलं, हातात ग्लोव्ह्ज घातले, बॅट हातात घेतली आणि माढाच्या पिचवर उतरले. मीच ओपनिंग बॅट्समन आहे, आता सेंच्युरी मारतो, असं म्हणाले. पण समोर मोदींची गुगली दिसल्यावर साहेब म्हणाले आता मी खेळतच नाही', अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी फडवणीसांवर निशाणा साधला.
या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सुप्रिया सुळेंनाही टोमणा मारला. 'सुप्रिया सुळेंनी काही गोष्टी मोदींकडून शिकून घेतल्या. मोदी पाकिस्तानला म्हणाले घरात घुसून मारेन. सुप्रिया सुळेही घरात घुसून मारेन, असं म्हणायला लागल्या.' असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं.
काय म्हणाले शरद पवार?
'इतक्या चुकीच्या आणि बेधडक खोट्या गोष्टी सांगून टाकतात. माझं बोट धरून इतक शिकले, आता मला माझ्या बोटाचीच काळजी वाटायला लागली आहे,' असं म्हणत शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधला. या सभेत बोलताना शरद पवार यांनी अमित शाह यांचीही नक्कल केली.