किरीट सोमय्यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल, निवडणूक आयोगाकडे तक्रार
किरीट सोमय्या हे राष्ट्रवादीच्या उमेदवार संजय भाऊचा प्रचार करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
मुंबई : निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसतशी उत्तर-पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा जोर वाढताना दिसत आहेत. त्यात एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या देखील लढविल्या जात आहेत. उत्तर-पूर्व मुंबईतून भाजपाकडून किरीट सोमय्या यांना तिकीट नाकारल्यानंतर किरीट सोमय्या नाराज असल्याची आवई विरोधी पक्षांतर्फे उठवण्यात असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. मनोज कोटक यांचा प्रचार करताना किरीट सोमय्या यांनी केलेल्या विधानाची व्हिडीओ क्लिप एडिट करून व्हायरल करण्यात आल्याचेही ते म्हणाले. किरीट सोमय्या हे राष्ट्रवादीच्या उमेदवार संजय भाऊचा प्रचार करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून निवडणूक आयोगाला तसेच मुंबई पोलिसांच्या सायबर सेलला या संदर्भात तक्रार दिली आहे. ह्या व्हिडीओ क्लिप मध्ये किरीट सोमय्या हे भाऊ हा माझ्यापेक्षा जास्त काम करतो अशा प्रकारचं विधान करताना दिसत आहेत.
दरम्यान अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल करून राष्ट्रवादीने भ्रमात राहू नये अशी टीका सोमय्या यांनी केली आहे. 29 तारखेला जनता तुमचा भ्रम मोडून काढेल असेही ते म्हणाल. तर हा व्हिडीओ आम्ही बनविला नसून ज्या माणसाला पक्षाने नाकारले त्या माणसाचा वापर आम्ही का करायचा ? असा प्रश्न आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी उपस्थित केला आहे.