मराठवाड्यात काँग्रेस चक्रव्युहात अडकली
काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता
विशाल करोळे, औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेसचा कस लागला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे स्वतः नांदेडमध्ये अडकले आहेत. चिखलीकर आणि भाजपाच्या आक्रमक प्रचारामुळे त्यांना नांदेडमधून बाहेरही पडता आलेलं नाही. दुसरीकडं नाराज अब्दुल सत्तारांनी औरंगाबादमध्ये काँग्रेसविरोधात रणशिंग फुंकलं आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवार सोडून हर्षवर्धन जाधवांना पाठिंबा जाहीर केला आहे.
जालन्यातील काँग्रेसच्या विलास औताडेंबद्दल सत्तारांनी कोणताही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळं औताडे गॅसवर आहेत. तीन दिवसांवर मतदान आलं असताना मराठवाड्यात काँग्रेस संघटनेत प्रचंड विस्कळीतपणा आला आहे. काही नेते हतबल आहेत, तर काही पक्षाविरोधात उभे ठाकले आहेत. अशा स्थितीत काँग्रेससाठी थेट जनताजनार्दनाचाच आधार राहिला आहे.