पुणे : शनिवारी सकाळी रामनवमी निमित्त पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील बांडेवाडी या गावातील यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे आणि भाजपचे स्टार प्रचारक चंद्रकांत दादा पाटील यांची समोरासमोर भेट झाली. यावेळी दोघांनीही एकमेकांना हसतमुखानं नमस्कार केला... आणि त्यानंतर दोघेही आपापल्या रस्त्यानं रवाना झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी, सांगलीत भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांची कन्या सुप्रिया सुळे या नक्कीच पराभूत होणार असं भाकीत वर्तवलं होतं. सुप्रिया हरणार असं चित्रं दिसत असल्यानंच पवार यांनी बारामती मतदार संघातील आपला प्रवास वाढवल्याचा दावाही त्यांनी केला होता. 



बारामती मतदार संघाच्या निवडणुकीनं यंदा अनेकांना आपल्याकडे आकर्षित केलंय. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या उमेदवार कांचन कूल असा सामना रंगणार आहे. कांचन कुल यांचे पती राहुल कुल हे दौंडचे आमदार आहेत. याच बद्दल बोलताना 'यंदा बारामतीत इतिहास घडणार' असं भाकीत चंद्रकांत पाटील यांनी वर्तवलंय. लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत दुग्धविकास व पशुसंवर्धन महादेव जानकर सुप्रिया सुळेंच्या विरोधातील उमेदवार होते. ही लढत अतिशय चुरशीची झाली... कधी नव्हे ते, सुप्रिया सुळेंचे मताधिक्य लाखाच्या आत आले. फक्त ७०,००० मतांच्या फरकाने सुळे विजयी झाल्या होत्या. त्यामुळे ही जागा यंदा जिंकण्याचा निर्धार भाजपानं पक्का केलाय.