मतदानावर बहिष्कार टाका; झाडाला लाल बॅनर्स बांधून नक्षलवाद्यांची मतदारांना धमकी
मंगळवारी छत्तीसगडमध्ये ऐन निवडणुकीच्या दरम्यान दंतेवाड्यात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदाराच्या ताफ्यावर हल्ला केला होता
दीपक भातुसे, झी २४ तास, गडचिरोली : विदर्भातल्या अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त गडचिरोलीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन नक्षलवाद्यांनी केलंय. छत्तीसगडमध्ये काल नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटात भाजपा आमदारासह पाच जण ठार झाले होते त्या पार्श्वभूमीवर या इशा-याकडे गांभीर्यानं पाहिलं जातंय. गडचिरोलीत एट्टापल्ली तालुक्यातल्या दुर्गम गावांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करणारे लाल रंगाचे बॅनर्स नक्षलवाद्यांनी झाडांना बांधलेले आढळले आहेत. छत्तीसगडमधल्या दंतेवाडा परिसरात ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांनी हल्ला केला त्या ठिकाणाहून गडचिरोलीतला हा परिसर फार दूर नाही.
दुसरीकडे मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अतिदुर्गम भागातील मतदान पथके रवाना झाली आहे. यासाठी काही ठिकाणी हेलिकॉप्टरचा वापर केला गेला. नव्या कृषी महाविद्यालय प्रांगणात याची जोरदार तयारी सुरू आहे. अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त भागातील मतदान सकाळी ७.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत होणार आहे. त्यानंतर ईव्हीएमसह पथके बेस कॅम्प आणि उपविभागातून जिल्हा मुख्यालयाकडे आणण्याचे काम सुरू होणार आहे.
मंगळवारी छत्तीसगडमध्ये ऐन निवडणुकीच्या दरम्यान दंतेवाड्यात नक्षलवाद्यांनी भाजपा आमदाराच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात भाजपा आमदार भीमा मंडावी यांच्यासह स्वीय सहायक ठार झाले तर या हल्ल्यात पाच जवानही शहीद झाले. मंडावी हे बस्तमधील एकमेव भाजपाचे आमदार होते. दंतेवाड्याजवळील नकुनार या ठिकाणी भूसुरूंग अंथरून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 'एन्टी लँड माईन्स व्हेईकल' उडवल्यानंतर नक्षलवाद्यांनी मंडावी यांना गोळ्या घालून ठार केलं. त्यामुळे परिसरात मोठं दहशतीचं वातावरण आहे.