पुणे : भाजपचे स्टार प्रचारक चंद्रकांत दादा पाटील यांनी सध्या एक मिशन हाती घेतलंय... ते म्हणजे 'मिशन बारामती'... बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपाच्या कांचन कूल असा सामना रंगणार आहे. तर दुसरीकडे मावळमध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार विरुद्ध शिवसेनेचे श्रीरंग बारणे असा सामना रंगणार आहे. याचबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मावळमध्ये लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे एकत्र आल्यानंतर पार्थ पवार जिंकणं शक्यच नसल्याचा दावा केलाय. इतकंच नाही तर अजित पवार यांनी आपल्या पुत्राचा पराभव आधीच ओळखून त्याला फॉर्म दाखल करण्यापासून रोखायला हवं होतं, असा काळजीचा सूरही त्यांनी काढला. ते झी २४ तासशी बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्ह्यातले पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातले कर्जत, उरण आणि पनवेल असे तीन विधानसभा मिळू्न मावळ हा लोकसभा मतदारसंघ तयार झालाय. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पार्थ पवार राजकारणात आपलं पहिलं पाऊल टाकत आहेत. ते पहिल्याच निवडणुकीत पराभूत व्हावेत असं आपल्याला वाटत नसल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलंय.


मावळच्या जागेबद्दल बोलताना 'मावळची जागा राष्ट्रवादीकडे जाण्याचं काही कारणच नाही. इथे ६ पैंकी ४ आमदार युतीचे आहेत. मुळात, लक्ष्मण जगताप हे श्रीरंग बारणेंना मदत करणार नाहीत या गणितावर अजित पवारांनी आपल्या मुलाला - पार्थ पवारला मावळमधून उमेदवारी मिळवून दिली. पण अचानक लक्ष्मण जगतापांनी आपल्या मनातील मतभेद बाजुला ठेवून बारणेंना मिठी मारली. याच दरम्यान फॉर्म भरायला सुरुवात झाली होती. तेव्हाच अजित पवारांनी पार्थ पवारांना फॉर्म भरण्यापासून रोखायला हवं होतं' असं मत चंद्रकांत दादा पाटील यांनी झी २४ तासशी बोलताना व्यक्त केलंय. 


'अजित पवार माझे विरोधक आहेत... पण माझी त्यांच्याशी चांगली मैत्री आहे. म्हणूनच मला असं वाटतंय की पार्थ पवार पहिल्याच निवडणुकीत पराभूत होईल, अशा स्थितीत त्याला आणून सोडायला नको होतं... लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे मावळमध्ये एकत्र आल्यानंतर पार्थ पवारांच्या विजयाची शक्यता पूर्णत: संपुष्टात आलीय' असंही भाकीत त्यांनी वर्तवलंय.