अहमदनगर : राज्यातले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी असल्याचं दिसतंय. उद्या - शुक्रवारी नगरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा होतेय. या सभेत राधाकृष्ण विखे पाटील भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मोदींच्या या सभेसाठी तीन दिवसांपूर्वी नगरमध्ये भाजपा नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. त्यामुळे विखे यांच्या भाजपा प्रवेशाची फक्त औपचारिकता बाकी असल्याचं दिसतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया देताना, 'विखे पाटील आमचे जेष्ठ नेते आहेत, ते विश्वासार्हता जपतील असा विश्वास आहे', अशी उपरोधिक टीका बाळासाहेब थोरातांनी विखे-पाटलांवर केलीय. विखे जिथे जातील तिथे काँग्रेसचंच काम करतील. भाजपाच्या बैठकीला गेले तर ते काँग्रेसच्या उमेदवाराचेच काम करतील, असंही विखे पाटील यांनी म्हटलंय. 



लोकसभा निवडणूक २०१९ ची घोषणा झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याची भूमिका जाहीर केली होती. राधाकृष्ण विखे यांची पत्नी आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद अध्यक्ष शालीनताई विखे पाटील मागील दोन ते तीन दिवसांपासून भाजपाचे नगरमधील उमेदवार सुजय विखे यांचा उघडपणे प्रचार करताना दिसत आहेत. तसंच राधाकृष्ण विखे पाटीलही मीडियाला आणि काँग्रेस नेत्यांना टाळत असल्याचं समोर आलं होतं. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील आता उघडपणे भाजपात दाखल होणार का? याविषयी जोरदार चर्चा रंगलीय.