इतरवेळी मोदी ठीक, पण निवडणुका आल्यावर अंगात येतं; पवारांचा घणाघात
मोदी यंदा पंतप्रधान होणार नाहीत, खासदार होतील, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
बारामती : मोदी यंदा पंतप्रधान होणार नाहीत, खासदार होतील, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. ते बारामतीमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. त्याचबरोबर ज्यांच्या घरातच कुणी नाही, त्यांनी दुसऱ्यांच्या घरातल्या भांडणाबद्दल बोलू नये, असा टोलाही पवारांनी मोदींना लगावलाय. मी कधी कुणावर व्यक्तिगत टीका करत नाही, तो ठेका मोदींनी घेतलाय, असंही पवार म्हणाले.
कोणावरही वैयक्तिक टीका करून नका, त्याची जबाबदारी पंतप्रधानांनी घेतली आहे, असा सल्ला पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. येत्या १० तारखेला पंतप्रधान हे बारामतीमध्ये आहेत, तेव्हा ते टीका करतीलच. काही दिवसांपूर्वी वर्ध्यात म्हणजेच बारामतीपासून ६००-७०० किलोमीटर लांब त्यांनी माझ्यावर टीका केली. हे काम त्यांच्याकडेच असल्याचा टोला पवारांनी लगावला.
'माझ्या घरात भांडण आहे, हे मोदींना कसं काय समजलं? मोदी साहेब आमचं घर भरलेलं आहे. ज्यांच्या घरात कोण आहे का नाही, हेच दुसऱ्याला माहिती नाही त्यांनी इतरांच्या घराबद्दल बोलू नये असे म्हणतात, असा चिमटाही पवारांनी काढला.'
'मोदींचे आणि माझे संबंध चांगले आहेत. मी कधी कुणावर व्यक्तिगत टीका करत नाही. हे त्यांनाही माहिती आहे. यावेळी मोदी पंतप्रधान झाले नाही झाले तरी कदाचित खासदार होतील. मीपण सध्या खासदार आहे त्यामुळे भेटल्यावर मोदींना आमच्या कुटुंबाबद्दल नक्कीच माहिती देईन', असा निशाणा पवारांनी साधला.
मोदींनी दिल्ली, बारामती आणि वसंतदादा श्यूगर इन्स्टिट्यूटमध्ये केलेल्या कौतुकाचा दाखलाही शरद पवार यांनी दिला. मोदींची ती भाषण देशभरात गाजली. मोदी इतरवेळी ठीक असतात, पण निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं, अशी बोचरी टीका शरद पवार यांनी मोदींवर केली.