राष्ट्रवादीच्या भास्कर विचारेंना जीवे मारण्याची धमकी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते भास्कर विचारे यांना धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबईतील राजकारण आता तापू लागले आहे. राज्यात युती आघाडी झाल्यानंतर एकमेकांचे उमेदवार पळवण्यास सुरूवात झाली. निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जाहीरनामेही प्रसिद्ध झाले आहेत. केलेल्या कामाचा लेखाजोखा आणि नवी आश्वासने सत्ताधारी पक्षातर्फे देण्यात येत आहेत. तर विरोधक सध्या न पाळलेल्या आश्वासनांवर टीका करण्यात येत आहे. जसजसे मतदान जवळ येत आहे तसेच राजकारण अधिक तापू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते भास्कर विचारे यांना धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भास्कर विचारे यांना ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादीच्या उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारा पासून बाजूला व्हा अन्यथा जीवे मारण्याची धमकी देणारा निनावी फोन आल्याचा प्रकार समोर आला आहे.
रात्रीच्या सुमारास एका अज्ञात मोबाइल क्रमांकावरून भास्कर विचारे यांना अनोळखी इसमाने हा कॉल केला होता. या कॉलमध्ये या इसमाने दोन शिवसेना आमदारांची नावे देखील घेतली आहेत. यासंदर्भात भांडुप पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.