शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात दीर विरुद्ध भावजय यांच्यात लढत; धाराशिवचा गड कोण राखणार?
धाराशिवमधला उमेदवाराचा तिढा आता सुटला. इथं चुलत दीर विरुद्ध भावजय असा नातेसंघर्ष पाहायला मिळणार आहे.
Lok Sabha Election 2024 : धाराशिव... नामांतराआधीचं उस्मानाबाद... एकेकाळची निजामाची राजधानी... महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं पावन मंदिर असलेला जिल्हा... शेकापचे नेते भाई उद्धवराव पाटील आणि माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यामुळं धाराशिव राजकीय पटलावर उदयाला आलं. सबके बाद उस्मानाबाद अशी नकारात्मक ओळख असलेला हा जिल्हा विकासापासून कोसो दूरच राहिला...
कायम दुष्काळी असलेला हा भाग...अविकसित जिल्ह्यांच्या यादीत धाराशिवचा तिसरा क्रमांक लागतो. मराठवाड्याच्या हक्काचं 21 टीएमसी पाणी अजून मिळालेलं नाही, त्यामुळं जिल्ह्याची तहान भागत नाही. शेतक-यांच्या आत्महत्या अजूनही संपलेल्या नाहीत. जिल्ह्यात एकही मोठा उद्योग अजून निर्माण होऊ शकलेला नाही. धाराशिवमध्ये कधीकाळी डॉ. पद्मसिंह पाटलांचं वर्चस्व होतं... सध्या शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून धाराशिव ओळखला जातो.
2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील यांनी शिवसेनेच्या रवींद्र गायकवाडांचा केवळ ६ हजार मतांनी पराभव केला. 2014 मध्ये शिवसेनेनं त्याची परतफेड केली. शिवसेनेच्या गायकवाडांनी पद्मसिंह पाटलांना तब्बल सव्वा दोन लाख मतांनी हरवलं. 2019 मध्ये शिवसेनेनं ओमराजे निंबाळकरांना आखाड्यात उतरवलं. त्यांनी आपले चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा जगजिंतसिंह पाटील यांचा सव्वा लाख मतांनी पाडाव केला. विधानसभेचा विचार केला तर शिवसेनेचे 3, भाजपचे 2 आणि 1 अपक्ष आमदार इथून निवडून आलेत.
धाराशिवमधील डॉ. पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातला राजकीय वैमनस्याचा रक्तरंजित इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहित आहे.. पवनराजेंच्या हत्येप्रकरणी पद्मसिंह पाटलांना अटकही झाली होती. आता तोच संघर्षाचा वारसा पुढच्या पिढीतही उतरलाय. पवनराजेंचे चिरंजीव खासदार ओमराजे निंबाळकर आणि पद्मसिंहांचे चिरंजीव भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्यातून विस्तवही जात नाही. शिवसेना ठाकरे गटानं आता पुन्हा एकदा ओमराजेंना उमेदवारी दिलीय.. तर राणांची पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करून तिकीट मिळवलं.
शिवसेनेचा हा बालेकिल्ला काबीज करण्यासाठी महायुतीनं मोर्चेबांधणी सुरू केलीय. भाजप आमदाराची पत्नी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उभी आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याकडून त्यांना राजकीय रसद मिळणाराय. त्यामुळं ही लढत आणखीच रंगतदार झालीय. निंबाळकर आणि पाटलांमध्ये परंपरागत वैर तर आहेच. आता त्याला राजकीय विरोधाची धार आलीय. ओमराजेंना हरवणं वाटतं तितकं सोप्पं नाही. नव-याच्या पराभवाचा वचपा अर्चना पाटील काढणार का? यासाठी 4 जूनपर्यंत वाट पाहावी लागणाराय.