औरंगाबादेत काँग्रेसमधून बंडखोरी, नाराज सत्तार अपक्ष रिंगणात
काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने नाराज अब्दुल सत्तार अपक्ष निवडणूक लढणार आहेत.
औरंगाबाद : काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने नाराज अब्दुल सत्तार अपक्ष निवडणूक लढणार आहेत. काँग्रेसचे नाराज आमदार अब्दुल सत्तार यांनी अखेर लोकसभेसाठी औरंगाबाद मतदारसंघातून अर्ज भरला आणि काँग्रेसविरोधात दंड थोपटले. काँग्रेसविरोधात प्रचार करणार आणि काँग्रेसला नमवणार, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. औरंगाबाद आणि जालन्याच्या उमेदवारीवरून सत्तार नाराज होते. सत्तार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने याचा फायदा हा शिवसेना - भाजपच्या युतीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे. मतविभाजनाचा फटका हा काँग्रेसला बसलण्याची शक्यता आहे.
औरंगाबादमध्ये काँग्रेसची उमेदवारी सुभाष झांबड यांना उमदेवारी जाहीर झाल्यानंतर सत्तार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत बंडाचं निशाण फडकावले. त्यानंतरही काँग्रेस सत्तारांना तिकीट देईल, अशी चर्चा होती. काँग्रेसच्या काही नेत्यांनी सत्तारांची विनवणी करण्याचाही प्रयत्न केला. मात्र सत्तार काही नमले नाहीत. अखेर झांबड यांना पक्षाचा बी फॉर्म देऊन काँग्रेसने सत्तारांचे बंड झिडकारले. त्यामुळे सत्तार यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरत आता काँग्रेसचा पराभव करण्याची मी तयारी केली आहे, असे ते म्हणालेत.