महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला? शिंदे गटाच्या शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची नावे समोर
Loksabha Election: महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाहीये. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारांची यादी जाहिर करु शकतात.
Loksabha Election: लोकसभा निवडणुकांसाठी राज्यात जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे. काँग्रेस आणि भाजपने उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. तर या उमेदवारांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. तर, एकीकडे प्रादेशिक पक्षांकडून एकही यादी जाहीर झालेली नाही. महायुती व महाविकास आघाडीमध्ये अद्यापही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता दोन दिवसच शिल्लक आहेत. मात्र अजूनही महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहिर झालेली नाही. अशातच महायुतीच्या संभाव्य उमेदवारांची पहिली यादी समोर आली आहे.
महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाची युती आहे. मात्र महायुतीत जागावाटपावरुन नाराजीनाट्य सुरू असल्याची चर्चा आहे. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहिर करु शकतात. महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, भाजपला 30 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 5 जागा मिळणार आहेत.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संभाव्य उमेदवार
राजू पारवे- रामटेक
संजय राठोड- वाशिम-यवतमाळ
प्रताप सरनाईक- ठाणे
श्रीकांत शिंदे- कल्याण-डोंबिवली
राहुल शेवाळे- दक्षिण मध्य मुंबई
श्रीरंग बारणे- मावळ
संजय मंडलिक- कोल्हापूर
हातकणंगले- धैर्यशील माने
प्रतापराव जाधव- बुलढाणा
सदाशिव लोखंडे- शिर्डी
तीन जागांवरुन जागावाटपाचे घोडे अडणार?
भाजपने पालघर किंवा रत्नागिरी यापैंकी एक जागा लढवण्याची भूमिका घेतली आहे. मात्र पालघर, रत्नागिरी आणि ठाणे या जागांवर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं यापैकी एकही जागा शिवसेना सोडायला तयार नाहीये. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघावर अद्यापही सहमती झाली नसल्याची माहिती आहे. दुसरीकडे ठाण्यात शिंदे गटाकडे प्रभावी उमेदवार नसल्याने ही जागा आपल्या वाट्याला यावी असं भाजपाचं म्हणणं आहे.
शिवसेनेचे माजी खासदार राष्ट्रवादीत
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आज हाती घड्याळ घेत असून पुणे जिल्ह्याच्या मंचर येथील शिवगीरी मंगल कार्यालयात दुपारी ४ वाजता अजित पवार दिलीप वळसे पाटील सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होत आहे.
२० वर्षानंतर आढळराव पाटील स्वगृही परतत असून यांच्यासोबत शेकडे कार्यकर्ते हि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे,त्यामुळे शिरूर ची लढत आता विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे विरूध्द माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यात रंगणार आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.