जालना : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कसे 'लक्ष्मीदर्शन' होणार आहे, याची चुणूक भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दाखवून दिली आहे. जालन्यामध्ये एका कार्यक्रमात आपण पैसे देतो, विरोधकांकडे पैसे नाहीत त्यामुळे ते आपल्याविरोधात एकत्र आले आहे, असे दानवेंनी सांगून टाकले आहे. खास वऱ्हाडी भाषेत केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाडण्यासाठी देशभरातले विरोधक एकत्र आलेत आणि जालन्यामध्ये आपल्याला पाडण्यासाठीही विरोधक एकत्र आलेत, असे दानवे म्हणाले. युती झाली असली तरी दानवेंचे काम करायला स्थानिक शिवसेना नेत्यांनी नकार दिला आहे. दानवेंच्या या विधानाबाबत विचारले असता हे योग्य नसल्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या' ओळखपत्र वाटप कार्यक्रमात दानवे यांनी विरोधकांचा खरपूस भाषेत समाचार घेतला. 'सगळेच लोक म्हणतायत मला जालना लोकसभा मतदार संघातून निवडून द्यायचे, मग निवडणूक घ्यायचीच कशाला ? असे म्हणत मला निवडून दिल्याशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकत नाही, असेही दानवे यांनी म्हटले आहे. 


दरम्यान, आधी स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत असलेल्या भाजप शिवसेनेची युती झाली आहे. मात्र कार्यकर्ते अजूनही आपापल्या पक्षाच्याच विजयाच्या घोषणा देताना दिसत आहे. या कार्यक्रमात उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी फक्त भाजप विजयाच्या घोषणा दिल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी भाजप-शिवसेना युतीचा विजय, असो अशा घोषणा द्या, असा सल्ला उपस्थितांना दिल्याने जोरदार हशा पिकला.