जावेद मुलाणी, झी मीडिया : बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Loksabha Constituency) हा राज्यातलाच नव्हे तर देशातलाही प्रतिष्ठेचा मतदारसंघ बनलाय. शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Aji Pawar) पहिल्यांदाच निवडणुकीत आमने सामने आहेत.  राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता पवार कुटुंबातील दोन महिला या निवडणुकीच्या मैदानात समोरासमोर आल्या आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) या उमेदवार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रतिभा पवार प्रचारात
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील  सगळ्या महिला मैदानात उतल्यात. आता यात प्रतिभा पवार (Pratibha Pawar) यांचाही समावेश झाला आहे. आतापर्यंत कधीही निवडणुकीत राजकीय व्यासपीठावर त्या आलेल्या नव्हत्या. मात्र लेकीसाठी, सुप्रिया सुळेंसाठी आई प्रतिभा पवार यांनी चक्क प्रचार केला. निमित्त होतं ते बारामतीत आयोजित महिला मेळाव्याचं. केवळ प्रतिभा पवारच नाही तर पवार फॅमिलीतील जवळपास सगळ्याच पॉवरफुल लेडीज या मेळाव्याला हजर होत्या.


प्रचारात 'पवार लेडीज'
शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, राजेंद्र पवारांची पत्नी सुनंदा पवार, श्रीनिवास पवारांची पत्नी शर्मिला पवार, रोहित पवारांची पत्नी कुंती पवार, बहिण सई पवार, अॅड. विद्या पवार सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे अशा पवार घराण्यातल्या सगळ्या लेकी-सुना मेळाव्याला हजर होत्या.


शरद पवारांनी मूळ पवार आणि बाहेरचे पवार असं वक्तव्य केल्यानंतर वादाला तोंड फुटलं होतं. सुनेत्रा पवारांना बाहेरची सून म्हटल्यानं अजितदादांनी जोरदार टीका केली होती. दरम्यान, सुप्रिया सुळेंच्या रक्तात पवारांचा डीएनए असल्याचं शर्मिला पवारांनी मेळाव्यात सांगितलं. तर सुप्रिया सुळेंच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन सुनंदा पवारांनी केलं. प्रत्येक निवडणुकीत मिशन हायस्कूलच्या मैदानात सुप्रिया सुळेंची सांगता सभा व्हायची. यावेळी अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेसाठी मैदानाची जागा बुक केलीय. त्यामुळं याच मैदानात मोठा महिला मेळावा घेऊन आणि पवार कुटुंबातील सगळ्या महिलांना एकाच व्यासपीठावर आणून सुप्रिया सुळेंनी शक्तिप्रदर्शन केलं...


बारामतीतील पवार विरुद्ध पवार ही लढाई आता टोकाला पोहोचलीय.. नणंद विरुद्ध भावजय या राजकीय लढाईत आता अख्खी पवार फॅमिलीच ओढली गेलीय. पवार कुटुंबातील महिला वर्ग सुप्रिया सुळेंच्या पाठीशी असल्याचं चित्र महिला मेळाव्याच्या निमित्तानं दिसलं.