लोकसभेच्या जागांवरुन महायुतीत महाभारत? शिंदे गटाच्या जागांवर भाजप आग्रही
Maharashtra Politics : लोकसभा निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात झालीय. येत्या काही दिवसात निवडणूकीची घोषणासुद्धा केली जाईल. महायुतीने महाराष्ट्रात 45 जागांचं टार्गेट ठेवलंय. पण त्याआधीच जागावाटपावरुन महायुतीत महाभारत रंगताना दिसतंय
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन महायुतीमध्ये (Loksabha Eleciton 2024) तिढा दिसतोय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रामटेकनंतर आता छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच सुरु आहे.. छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा युतीमध्ये पहिल्यापासूनच शिवसेनेकडे (Shivsena) आहे. आता भाजपने (BJP) या मतदारसंघावर दावा ठोकलाय. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड छत्रपती संभाजीनगरमधून लढण्यासाठी इच्छूक आहेत. शिंदे गटाच्या या एकाच मतदासंघावर नाही तर अनेक मतदारसंघांवर भाजपने दावा ठोकलाय.
शिंदे गटाच्या जागांवर भाजप आग्रही
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये पहिल्यापासूनच शिवसेनेकडे आहे. मात्र शिंदे गटाच्या (Shinde Group) या जागेवर भाजपचे भागवत कराड लढण्यासाठी इच्छूक आहेत. मावळमध्ये शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आहेत. मात्र इथंही राष्ट्रवादी काँग्रेससह (NCP) भाजपनेही दावा ठोकलाय. नाशिकमध्ये शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आहेत. मात्र ही जागा भाजपला सोडण्यात यावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवलंय. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आहेत. शिवसेनेची जागा असल्याने मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत लढण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र भाजपकडून नारायण राणेंनी या मतदारसंघावर दावा ठोकलाय...
मराठवाड्यातील शिंदे गटाचे एकमेव खासदार म्हणजे हेमंत पाटील. मात्र हिंगोलीची जागा भाजपला सोडावी अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केलीय. साताऱ्यात विद्यमान खासदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे श्रीनिवास पाटील आहेत. त्यामुळे अजित पवार गटाने दावा सांगितलाय. मात्र आता भाजपनेही ही जागा सोडण्याची मागणी केलीय. रामटेकमध्ये शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने आहेत. इथंही भाजपने आपला दावा सांगितलाय. तर दक्षिण मुंबईच्या शिवसेनेच्या जागेवर भाजपकडून राहुल नार्वेकर इच्छूक असल्याचं समजतंय.
कोकणात धुमशान
कोकणातल्या जागेवरुन महायुतीत चांगलंच धूमशान रंगणार अशी चिन्हं आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा भाजपचीच असून भाजपच ही जागा लढवणार आहे, असं नारायण राणेंनी म्हटलंय. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवतायत, मात्र भाजपच ही जागा लढवणार असल्याचं ट्विट नारायण राणेंनी केलंय. तर दुसरीकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरुन शिवसेनेचे उदय सामंतही आक्रमक झालेत. जिथे शिवसेनेचे खासदार तिथे शिवसेनेचा दावा असेल असं उदय सामंत यांनी म्हटलंय. रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणे निवडणूक लढतील अशी शक्यता आहे, तर उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंतही इच्छुक आहेत.
दक्षिण मुंबईतही चुरस
दक्षिण मुंबईच्या जागेवरुनही महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. कारण मिलिंद देवरा यांना पक्षाने लोकसभेसाठी तयारी करायला सांगितलंय, सूत्रांनी ही माहिती दिलीय. दक्षिण मुंबईची पकड असलेला नेता आणि सुशिक्षित पुरोगामी चेहरा म्हणून देवरांना उमेदवारी देण्याचा शिंदे गट विचार करतंय. दक्षिण मुंबई जागा ही शिवसेनच्या खात्यातली आहे. तर दुसरीकडे भाजपकडून राहुल नार्वेकरांचं नावही दक्षिण मुंबईमधून चर्चेत आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईत कुणाला उमेदवारी मिळणार, याची उत्सुकता आहे.
शिंदे गटाच्या वाट्याला असणाऱ्या मावळ लोकसभेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपनंही दावा केलाय. मावळ लोकसभा मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका होतायत. मावळमध्ये भाजपचे तीन आमदार, दोन महापालिका, अनेक नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीवर सत्ता असल्यानं या मतदारसंघावर भाजपनं दावा ठोकलाय.
भाजप आणि शिंदे गटामध्ये सध्यातरी चांगला समन्वय दिसून येतो. आणि भाजपने दावा सांगितलेले जवळजवळ सर्वच मतदारसंघ हे शिंदे गटाचे आहेत.. गरज पडल्यास पालघर पॅटर्न राबवण्याचे संकेत मंत्री दीपक केसरकरांनी याआधीच दिले होते. पालघरमध्ये राजेंद्र गावित भाजपचे असताना ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले आणि त्यांनी निवडणूक जिंकली. तेव्हा वादग्रस्त जागेवर अदलाबदलीचा फॉर्म्युलाही वापरला जाऊ शकतो. खरं चित्र जागावाटपानंतरच स्पष्ट होऊ शकतं.