LokSabha 2024: लोकसभा निवडणुकीसाठी अद्यापही महायुतीकडून उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आलेली नाही. याचं कारण महायुतीत 3 जागांवरुन तिढा निर्माण आहे. एकीकडे महाविकास आघाडीत तिढा कायम असताना, महायुतीतही तसाच वाद सुरु आहे. दरम्यान भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने यामध्ये लक्ष घातलं असून लवकरात लवकर तोडगा काढण्यास सांगितलं आहे. त्यामुळे ही कोंडी फुटणार की महायुतीत मिठाचा खडा पडणार? हे चित्र आगामी दिवसांमध्ये स्पष्ट होईल.


 
एकनाथ शिंदे बालेकिल्ला सोडणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुतीत ज्या तीन जागांवरुन वाद सुरु आहे त्यामध्ये ठाणे, पालघर, रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या तीन जागापैंकी भाजपाला एक जागा हवी आहे. मात्र एकनाश शिंदेंची शिवसेना यासाठी अजिबात अनुकूल नाही. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघावर अद्यापही सहमती झाली नसल्याची माहिती आहे. दुसरीकडे ठाण्यात शिंदे गटाकडे प्रभावी उमेदवार नसल्याने ही जागा आपल्या वाट्याला यावी असं भाजपाचं म्हणणं आहे. 


ठाण्याची जागा भाजपाला सोडून कोकणात तिन्ही पक्षात योग्य समनव्य साधला जाईल अशी भाजपाची भूमिका आहे. पण भाजपाने ठाण्याच्या जागेवर दावा केला असल्याने जागावाटपाचं घोडं अडलं आहे. 


दिल्लीतून तोडगा काढण्याचे आदेश


दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाने पालघर किंवा रत्नागिरी यापैंकी एक जागा लढवण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत महायुतीच नेत्यांनी पुन्हा बैठक घेत तोडगा काढण्याची सूचना दिल्लीतून भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्या आहेत. 


कोण किती जागा लढवणार?


सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीत अद्यापही जागावाटप निश्चित झालेलं नाही. सध्या जो फॉर्म्यूला मांडण्यात आलेला आहे तो एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मान्य नाही. या सूत्रानुसार, भाजपा 30, शिवसेना 13 आणि राष्ट्रवादी 5 जागांवर लढेल. पण एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी आपल्या वाट्याला जास्त जागा याव्यात अशा मागणी केली आहे. 


मनसेची अडचण?


महायुतीत आधीच जागावाटपावरुन एकमत होत नसताना मनसेच्या समावेशामुळे समीकरण बिघडत आहे. याचं कारण राज ठाकरेंनी तीन जागांची मागणी केली आहे. ज्यात दक्षिण मुंबई, शिर्डी आणि नाशिकचा समावेश आहे. त्यात शिर्डी आणि नाशिकमध्ये शिंदे गटाचा खासदार आहे. त्यामुळे शिंदे गट या जागा सोडण्यास इच्छुक नसेल. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी मनसेला महायुतीत घेण्यास विरोध केला असून दिल्ली दरबारी म्हणणं मांडलं आहे. त्यामुळे यासंबंधी काय निर्णय होतो हेदेखील पाहावं लागेल.