सोनू भिडे, झी मीडिया, नाशिक : 9 मार्च हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) स्थापना दिन... पक्ष स्थापनेचा हे 18 वं वर्ष. या वर्षी वर्धापन दिन (Anniversary) साजरा करण्याचा मान पहिल्यांदाच नाशिक शहराला मिळाला आहे. यामुळे नाशिकमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. या वर्धापन दिनासाठी राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी पाथर्डी फाटा इथं राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. तर आज त्यांनी नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम मंदिरात (Kalaram Temple) मुलगा अमित ठाकरे (Amit Thackeray) सून मिताली ठाकरे (Mitali Thackeray) यांच्या सोबत आरती करत दर्शन घेतलं. शनिवारी म्हणजे 9 मार्चला राज ठआकरे यांची दादासाहेब गायकवाड सभागृहात जाहीर सभा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काळाराम मंदिरात केली आरती
आज सकाळी 9 वाजता राज ठाकरे, अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे काळाराम मंदिरात आरती करण्यासाठी निघाले. यावेळी त्यांचे नाशिक शहरात विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलं. 10 वाजता काळाराम मंदिरात पोह्चल्यानंतर त्यांनी काळाराम मंदिरात विधिवत पूजा केली. अमित ठाकरे यांनी सपत्नीककाळाराम मंदिरात पूजा केली. यावेळी राज ठाकरे आणि मनसेचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. पूजा झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मंदिर परिसरात विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.


अनेक नेत्यांची काळाराम मंदिराला भेट 
देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी नाशिकच्या या प्रसिद्ध काळाराम मंदिराला भेट दिली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी परिवारासह काळाराम मंदिराला भेट दिली. तर आज राज ठाकरे यांनी मुलगा अमित ठाकरे सून मिताली ठाकरे यांच्या सोबत काळाराम मंदिरात पूजा केली. येत्या 14 मार्चला कॉंग्रेस नेते राहुल गांधी नाशिक दौऱ्यावर येणार असून ते हि काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. 


लोकसभेची तयारी
लोकसभेची आचारसंहिता आठ दिवसात लागण्याची शक्यता असताना राज ठाकरे हे नाशिक शहरात तीन दिवसीय दौरा करत आहे. तसेच वर्धापन दिन सुद्धा नाशिक शहरात साजरा केला जात आहे. काळाराम मंदिराची आरती केल्यानंतर त्यांनी विविध संघटनाच्या लोकांशी संवाद साधल्याने मनसे नाशिकमधून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार हे निश्चित झालं आहे. 


सभेत काय घोषणा करणार 
9 मार्चला राज ठाकरे यांची नाशिक शहरात दादासाहेब गायकवाड सभागृहात जाहीर सभा होणार आहे. या सभेला नाशिक शहरासह उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हजर राहणार आहेत. या जाहीर सभेत राज ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार काय ?  नाशिक दिंडोरी आणि उत्तर महाराष्ट्राचे उमेदवार जाहीर करणार काय ? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.