MNS Leader Left Party As Raj Thackeray Announce Support to BJP PM Modi: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी दादारमधील शिवाजी पार्क येथे आयोजित गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र राज यांनी हा निर्णय घेतल्यानंतर त्यांना पहिला धक्का पक्षाच्या सरचिटणीसांनी दिला आहे. राज ठाकरेंच्या या नव्या राजकीय भूमिकेमुळे मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सोशल मीडियावर 'अलविदा मनसे' या मथळ्याखाली एक सविस्तर पोस्ट करत शिंदेंनी मनसेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' केला आहे.


एक 'अनाकलनीय' वर्तुळ पूर्ण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

""महाराष्ट्र नवनिर्माण सेना 'भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे..." अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक 'अनाकलनीय' वर्तुळ पूर्ण झालं," असं किर्तीकुमार शिंदेंनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.


थेट राज ठाकरेंना विचारला सवाल


"पाच वर्षांपूर्वी 2019 लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप- मोदी- शाहविरोधात रणशिंग फुंकलं होतं तो माझ्यासाठी (राजकीय पातळीवर) अत्यंत महत्त्वाचा काळ होता. त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर- 'लाव रे तो व्हिडिओ' सभांना मी उपस्थित होतो आणि सभांमध्ये ते जे भाजप- मोदी- शाह यांच्या विरोधात जे तथ्य- विचार मांडत होते त्यांबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो," अशी आठवणही किर्तीकुमार शिंदेंनी या पोस्टमध्ये करुन दिली आहे. किर्तीकुमार शिंदेंनी पुढे राज ठाकरेंना थेट एक सवाल विचारला आहे. "आज 5 वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते. त्याचं काय?" असं असा प्रश्न शिंदेंनी विचारला आहे.


भाजपाचं हिंदुत्व मान्यच होणार नाही


"गेल्या 10 वर्षांत, त्यातही विशेष करून मागच्या 5 वर्षांत 'भामोशा'ने देशाचं अक्षरशः वाटोळं केलं आहे. पारदर्शक कारभाराचा दावा करत सत्तेवर येऊन 'भामोशा' अपारदर्शक हुकूमशाहीने दडपशाही करत आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या चौकशांचा ससेमिरा पाठीमागे लावून भाजपेतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना गजाआड पाठवण्याची भीती दाखवून वॉशिंग मशीनमध्ये घालून त्यांचे शुद्धीकरण करून त्यांचे 'भामोशा'मध्ये सक्तीने पक्षांतर करवून घेतले जात आहे. 'भामोशा'चे विचार ज्यांना पटतात ते राष्ट्रप्रेमी किंवा हिंदू, आणि 'भामोशा'च्या विरोधात आहेत ते राष्ट्रद्रोही किंवा अहिंदू! या नव्या समीकरणामुळे जातपातधर्माच्या नावाखाली माणसाला माणूसपणापासून तोडण्याचे काम सुरू आहे. अत्यंत नम्रपणे सांगतो की, प्रबोधनकारांची अनुपलब्ध पुस्तके प्रकाशित करून त्यांचा वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्याला 'भामोशा'चं असलं राष्ट्रीयत्व- 'हिंदुत्व' मान्यच होऊ शकत नाही," असं म्हणत किर्तीकुमार शिंदेंनी भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर टीका केली आहे.


नक्की वाचा >> 'राज ठाकरेंना दोघांची विकेट काढायचीये?' आव्हाडांना वेगळीच शंका; म्हणाले, 'एकमेकांना शिव्या..'


ही राज ठाकरेंची गरज असू शकते


"राजसाहेब ठाकरे यांनी 'भामोशा'ची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं, पण त्यातून महाराष्ट्राचा- मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यांची ही भूमिका सत्तेच्या राजकारणात, मनसेचे आणि स्वत:चे अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य असू शकेल, पण त्यांनी घेतलेली बाजू सत्याची नाही," असा हल्लाबोल किर्तीकुमार शिंदेंनी केला आहे. 



मला नेहमीच प्रेमाने आणि उचित सन्मानाने वागवलं


"खरं तर असे अनेक मुद्दे राजसाहेबांशी भेटून बोलायचे होते. पण ते शक्य नाही! त्यामुळे हा प्रवास इथेच थांबवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीसपदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देत आहे," असं किर्तीकुमार शिंदेंनी म्हटलं आहे. तसेच पोस्टच्या शेवटी, "एक गोष्ट इथे आवर्जून नमूद करतो. राजसाहेब ठाकरे, अमित ठाकरे आणि मनसेचे सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते यांनी मला नेहमीच प्रेमाने आणि उचित सन्मानाने वागवलं. त्यांच्यामुळे मला अनेक चांगल्या विषयांवर काम करता आलं. मनसे सोडण्याच्या माझ्या या भूमिकेचा- कृतीचा कुठल्यातरी उथळ गोष्टीशी बादरायण संबंध जोडून उठवळ राजकारणाचा धुरळा उडवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, ही अपेक्षा," असंही किर्तीकुमार शिंदे म्हणालेत.