Raj Thackeray Unconditional Support To Modi: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी मुंबईमधील दादार येथील शिवाजी पार्कच्या मैदानात आयोजित केलेल्या पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. पंतप्रधान मोदींकडून आपल्याला काही अपेक्षा आहेत. आश्वासक चेहरा म्हणून आपण त्यांना पाठिंबा जाहीर करत आहोत, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या या भूमीकेनंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असतानाच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या 2 शब्दांचा अर्थ नेमका काय असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विकेट काढण्याचा तर हा डाव नाही ना अशी शंका उपस्थित केली आहे.
मंगळवारी सायंकाळी राज ठाकरेंचं मेळाव्यातील भाषण संपल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्वीटर हॅण्डलवरुन व्हिडीओच्या माध्यमातून एक प्रतिक्रिया पोस्ट केली. यामध्ये आव्हाड यांनी, "आज राज ठाकरेंचा मेळावा होता. मेळावा घ्यायचा कशाला ना? साधं एका वाक्यात ट्वीट केलं असतं की, मोदींना बिनशर्त पाठिंबा पण व्याभिचाराला राजमान्यता देऊ नका असं म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण हे व्याभिचाराला राजमान्यता या शब्दाचा अर्थ उभ्या महाराष्ट्राला समजलेला नाही," असं म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना 'व्याभिचाराला राजमान्यता' या शब्दांचा काही गर्भीतार्थ आहे का असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला.
"व्याभिचाराला राजमान्यता नाही म्हणजे मोदींना बिनशर्त पाठिंबा देऊन इतर दोघांची विकेट काढायची की काय? कार्यकर्ते गोंधळात पडलेत त्यांना समजतच नाही काय करायचं ते," असं आव्हाड म्हणाले. त्याचप्रमाणे पुढे फिल्मी स्टाईल टोला लगावताना, "महाराष्ट्रातील ही सारी परिस्थिती पाहून मला एक गाणं आठवलं. जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग. एक चेहरे पर कई चेहरे लगा लेते हैं लोग," हे गाणंही आव्हाड यांनी म्हणून दाखवलं. "खरं आहे हो. काय चेहरे बदलत आहेत. कालपर्यंत एकमेकांना शिव्या घालणारे लोक आज एकमेकांना घट्ट मिठी मारताना दिसत आहेत. त्या मिठीतून मुंगी जाणार नाही अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्र किती बदलला. माझा भारत तर बदतोच आहे पण माझा महाराष्ट्र देखील बदलतो आहे," असं आव्हाड म्हणाले.
मोदींना 'राज'मान्यता पण, "व्याभिचाराला" नाही, राज ठाकरे यांच्या या वाक्याचा अर्थबोध झाला नाही; कार्यकर्त्यांनाही हे समजलेले नाही. मोदींना पाठिंबा देताना व्यभिचाराला पाठिंबा नाही, असे म्हणणे म्हणजे सोबत असलेल्या दोघांना पाठिंबा नाही, असा तर अर्थ नाही ना? pic.twitter.com/oi3D1Ruiri
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 9, 2024
आव्हाड यांनी अन्य एका ट्वीटमध्ये 'सिंहासन' चित्रपटामधील आनंदराव या भूमिकेच्या तोंडी असलेल्या एका संवादाचा स्क्रीन शॉट पोस्ट केला आहे. यामध्ये आनंदराव 'तुम्हाला सांगू आबा, सगळ्या असंतुष्टांचं सर्व असंतुष्टांशी थोडा थोडा वेळ जमतं,' असं म्हणताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना आव्हाड यांनी, 'आठवतो का हा सिनेमा… जय सत्यनारायणा एकदा तरी मुख्यमंत्री बनवाच…' अशी कॅप्शन दिली आहे.
आठवतो का हा सिनेमा….
जय सत्यनारायणा एकदा तरी मुख्यमंत्री बनवाच …#सिंहासन pic.twitter.com/sHDWQIxsSD— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 9, 2024
राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी 'वाघ गवत खायला लागला आहे,' असा खोचक टोला मनसे अध्यक्षांना लगावला.