Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात  शुक्रवारी म्हणजे 19 एप्रिलला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 5 तर देशातील 102 मतदारसंघात येत्या 19 एप्रिलला मतदान होणाराय. महाराष्ट्रात ज्या पाच मतदारसंघात (Constituency) पहिल्या टप्प्यात निवडणूक होणाराय, त्यात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा, गडचिरोली या मतदारसंघांचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावला... पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचारसभा महाराष्ट्रात झाल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतदानासाठी प्रशासनाची जय्यत तयारी
चंद्रपूर जिल्हा प्रशासनानं (Chandraput Loksabha Constituency) या मतदानाच्या पहिल्या टप्प्यासाठी जय्यत तयारी केलीआहे. या मतदारसंघात 18 लाख 37 हजार 906 मतदार आहेत. सहा विधानसभा क्षेत्रात एकूण 9 हजार 322 निवडणुक कर्मचारी आणि 3 हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तात मतदान पार पडेल. जिल्ह्यात एकूण 4510 मतदान केंद्रे आहेत.


नागपूर लोकसभा मतदार (Nagpur Loksabha Constituency) संघात 2105  मतदान केंद्र आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुमारे 54 टक्के मतदान झाले होते. यंदा ही टक्केवारी 75 टक्क्यांवर नेण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात आले आहे. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघ मिळून 124 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. यात रामटेकमध्ये 63 तर नागपूरमध्ये 61 केंद्रे आहेत. यातील सुमारे 50 टक्के मतदान केंद्राचं वेबकास्टिंग होणार आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघ मिळून 12 महिला मतदान  केंद्रे  असणार आहेत. प्रत्येक विधानसभेत प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र असणार आहे.


कडेकोट पोलिस बंदोबस्त
नागपूर लोकसभेसाठी 321 पोलिस अधिकारी, 4 हजार 250 पोलिस कर्मचारी आणि 1 हजार 800 होमगार्डस यांच्यासह केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात असणार आहेत. रामटेकसाठी 151 अधिकारी, 2 हजार 676 कर्मचारी, 1 हजार 534 होमगार्ड आणि 3 केंद्रीय पथक असणार आहेत. संवेदशील केंद्रामध्ये अधिकचे पोलिस मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहेत.


या नेत्यांचं भवितव्य पणाला
- नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.. काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्याशी त्यांची लढत आहे. वंचितनं काँग्रेसचे विकास ठाकरेंना पाठिंबा दिलाय. 
- चंद्रपूरमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी तगडं आव्हान निर्माण केलं आहे. 
- रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे यांना शिवसेनेचे राजु पारवे यांनी आव्हान दिलंय. काँग्रसचे बंडखोर किशोर गजभिये देखील रिंगणात आहेत.  त्यांना वंचितनं पाठिंबा दिलाय.
- भंडारा गोंदियामध्ये भाजप खासदार सुनील मेंढे आणि काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे रिंगणात आहेत. हे दोघेही कुणबी आहेत. भाजपातून बसपात प्रवेश करुन उमेदवारी मिळवलेले संजय कुंभलकर हे तेली समाजाचे आहेत. संजय केवट हे धिवर समाजाचे आहेत.
- गडचिरोलीत भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ नामदेव किसरान यांच्यात लढत होत आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे हितेश मढावी यांना रिंगणात उतरवलंय..