`जर आम्ही ठरवलं तर 4 ते 5 मिनिटात....,` महायुतीतील जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले
LokSabha Election: महायुतीमधील जागावाटप अद्यापही अंतिम झालेलं नाही. महायुतीत काही मतदारसंघांवरुन तिढा असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावा फेटाळला आहे.
LokSabha Election: लोकसभा निवडणुकीचं रणशिंग वाजलं असून अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीकडून सर्व मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. महायुतीमध्ये एकीकडे काही मतदारसंघांवरुन तिढा निर्माण झालेला असताना मनसे सहभागी होत असल्याने जागावाटपाला उशीर होत असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावा फेटाळला आहे. आम्ही ठरवलं तर 4 ते 5 मिनिटात चर्चा संपेल असं ते म्हणाले आहेत. "आमचा तिढा नाही. आमच्यात चर्चा सुरु आहे. ती 5 ते 10 मिनिटात संपू शकते," असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
"जागावाटपाबाबत 2 ते 3 दिवसांत चित्र स्पष्ट होईल. महायुती म्हणून आम्ही 13 पक्ष एकत्र निवडणूक लढणार आहोत. बूथवर आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. 51 टक्के मतं मिळतील अशी आम्हाला आशा आहे. नरेंद्र मोदींनी सुरु केल्या योजना आणि महाराष्ट्राला केलेली मदत यामुळे आम्हाला मतं मिळतील. काँग्रेसची 65 आणि मोदींची 10 वर्षं यांची तुलना केल्यास मोदींची 10 वर्षं वरचढ ठरतात. जनतेलाही विकसित भारतासाठी मोदींना साथ दिली पाहिजे हे आता समजलं आहे," असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत 7 ते 8 टक्के वाढतील असं दिसत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
'अमरावतीत भाजपाचाच उमेदवार'
तसंच अमरावतीची जागा भाजपाच लढणार असून, भाजपाचाच उमेदवार असेल असंही स्पष्ट केलं. "कोण प्रवेश करणार, कोण नाही यापेक्षा अमरावतीची जागा भाजपाच लढणार, भाजपाचाच उमेदवार असेल हे महत्वाचं आहे. आनंदराव अडसूळ, बच्चू कडू या सर्वांची मदत घेऊन आणि 100 टक्के जिंकू. सर्व घटक पक्षांची मदत घेऊ आणि ते करतील असा विश्वास आहे," असं ते म्हणाले.
"अशा अनेक जागा आहे जिथे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादीची प्रत्येकाची ताकद असून उमेदवार जिंकू शकतो. सर्वांचं महत्व लक्षात घेऊनच जागावाटप केलं जाईल. एकनाथ शिंदे, अजित पवार यांची प्रतिष्ठा राखत त्यांना सोबत ठेवायचं ही भाजपाची भूमिका आहे. 4 ते 5 मिनिटांत चर्चा संपेल इतकं सोपं आहे. आम्ही चाचपणी करत असून, राज्य आणि केंद्रातील नेतृत्व पुढाकार घेत जागावाटप करत आहे," असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं.