LokSabha Election: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरुन अद्यापही शिंदे गट आणि भाजपमध्ये एकमत झाल्याचं दिसत नाही. एकीकडे शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा असताना, नारायण राणे मात्र माघार घेण्याच्या तयारीत नाहीत. नारायण राणे वारंवार जाहीरपणे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत असताना शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची चर्चा आहे. या सर्व घडामोडींदरम्यान उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांच्या व्हॉट्सअप (WhatsApp) स्टेटसमुळे चर्चा रंगली आहे. शिंदे गटाकडून किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरण सामंत यांनी व्हॉट्सअपला अजित पवारांच्या भाषणातील एक व्हिडीओ क्लिप शेअऱ केली आहे. अजित पवारांनी या भाषणात म्हटलं होतं की, जर मिठाचा खडा पडला, तर आमदारकीसाठी कोणाच्या बापाला ऐकणार नाही. अजित पवारांचा व्हिडीओ शेअर करत किरण सामंत यांनी धमकीवजा इशाराच दिल्याची चर्चा आहे. किरण सामंत यांना या स्टेटसमधून नेमकं काय सांगायचं आहे आणि कोणाला इशारा द्यायचा आहे याची चर्चा रंगली आहे. 


किरण सामंत यांनी व्हिडीओ शेअर करताना वरती लिहिलं आहे की, 'मिठाचा खडा, कुणाच्या बापाचं ऐकायचो नाही'. 


अजित पवार भाषणात काय म्हणाले होते 


अजित पवारांनी 4 फेब्रुवारीला बारामती व्यापारी महासंघातर्फे आयोजित मेळाव्यात भाषण दिलं होतं. यावेळी  ‘माझ्या मताचाच खासदार हवा’, असं म्हणताना अजित पवारांनी थेट बारामतीच्या मतदारांनाच इशारा दिला होता. ‘लोकसभा व विधानसभा या दोन्ही वेळेला मला तुमची साथ लागेल. आपल्या विचारांचा खासदार झाला तर मोदी, शाहांकडून मी हवी तेवढी विकासाची कामे मंजूर करून आणू शकतो. त्यासाठी माझ्याच विचारांचा खासदार असणे आवश्यक आहे. मला खासदारकीला मिठाचा खडा लागला तर आमदारकीला मी वेगळा विचार करेन, त्यावेळी कुणाच्या बापाचे ऐकणार नाही’, असा इशारा अजित पवार यांनी दिला होता. 


माघार घेतल्याचीही रंगली होती चर्चा


रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून किरण सामंत यांनी माघार घेतल्याचीही चर्चा होती. त्यांच्या एका पोस्टमुळे ही चर्चा होती. पण उदय सामंत यांनी हा दावा फेटाळला होता. आपण किरण सामंतांजवळ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क केला आणि ही पोस्ट सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती उदय सामतांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत दिली होती. इतकंच नाही तर आजही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती शिवसेनेचाच दावा कायम असल्याचंही सांगितलं होतं.