माढा मतदारसंघात भाजपच्या तिकीटावर विजयसिंह मोहिते पाटील?
शरद पवारांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आणि माढ्याचा तिढा वाढला
सोलापूर : लोकसभा निवडणूक २०१९ साठी माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार अजून निश्चित झालेला नाही. मात्र, आता भाजपाच्या तिकीटावर स्वतः विजयसिंह मोहिते पाटील माढ्यातून लढण्याची शक्यता आहे. मोहिते पाटील कुटुंबातल्याच एका विश्वसनीय सूत्रानं ही माहिती दिली आहे. भाजपात प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते पाटील आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्या नावाची भाजपामध्ये याआधीच चर्चा सुरू आहे. त्यातच आता भाजपामध्ये प्रवेश न केलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झालीय.
अधिक वाचा :- राष्ट्रवादीला खिंडार, मोहित पाटील पिता-पुत्र भाजपच्या वाटेवर?
पहिल्यांदा माढा मतदारसंघातून आपण स्वतः निवडणूक लढणार असल्याचं पवारांनी सांगितलं. त्यामुळे मोहिते पाटलांसह पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले. मात्र, ऐनवेळी पवारांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आणि माढ्याचा तिढा वाढला. शरद पवार यांनी माढ्यातून उमेदवारी माघारी घेतली काय सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात खूप मोठी उलथापालथ झालेली दिसून आली. लोकसभा निवडणूक २०१९ च्या तोंडावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि शरद पवारांचे मित्र आणि जास्त जवळीक असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादीतही माढ्याच्या जागेबाबत काहीही निर्णय झालेला नसल्यानं मोहिते पाटील नाराज होते.