मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ साठी काँग्रेसची राज्यातल्या दुसरी उमेदवारी यादी जाहीर झालीय. या यादीत अनेक अनपेक्षित नावांचा समावेश करण्यात आलाय. नांदेडमधून अशोक चव्हाणांनाच काँग्रेसनं मैदानात उतरवलंय. तर चंद्रपूरमधून विलास मुत्तेमवार यांचे चिरंजीव विशाल मुत्तेमवार यांना उमेदवारी दिलीय. धुळ्यातून रोहिदास पाटील यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव आणि विद्यमान आमदार कुणाल पाटील यांना मैदानात उतरवलंय. तर यवतमाळ-वाशिममधून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना उमेदवारी देण्यात आलीय. वर्ध्यातून चारूलता टोकस तर अकोल्यातून डॉ. अभय पाटील यांना तर रामटेकमधून किशोर गजभिये यांना उमेदवारी देण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापूर्वी, १३ मार्च रोजी राज्यात भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नाना पटोले यांना महाराष्ट्रात नागपूरमधून, गडचिरोलीतून डॉ. नामदेव उसेंदी, दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा तर सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे, उत्तर-मध्य मुंबईतून माजी खासदार प्रिया दत्त यांची नावं पक्षानं अधिकृतरित्या जाहीर केली होती.


दुसरीकडे, विरोधीपक्ष नेते पदाचा आपण राजीनामा दिलेला नाही असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय. सुजय विखे यांच्या भाजपा प्रवेशानंतर कोंडी झाल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त पसरलं होतं. मात्र, विखे पाटलांनी स्वतः या वृत्ताचं खंडन केलंय.