`काळ्या जादू`चा धसका, काँग्रेस आमदाराच्या घराबाहेर सीसीटीव्ही तैनात
दोन दिवसांपूर्वी त्यांच्या या घरासमोरच्या झाडामध्ये हळद-कुंकू लावलेली एक काळी बाहुली आढळली होती
कोल्हापूर : कोल्हापूरचे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी 'आपल्या घरासमोर कुणीतरी काळी जादू केल्याचा' दावा केलाय. बावडा इथल्या त्यांच्या घरासमोर काही झाडं आहेत. यापैंकी एका झाडाला काळी बाहुली दोऱ्याने बांधलेली आढळून आली. गेल्या आठ दिवसांत दोनदा असा प्रकार घडलाय. त्यामुळे कोणीतरी काळी जादू केल्याचा दावा त्यांनी केलाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांच्या घराच्या संरक्षण भिंतीवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचं काम केलं जात आहे.
लोकसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे विरोधकांकडून काळी जादू करण्याचा प्रयत्न होत असल्याचाही त्यांनी आरोप केलाय. भानामती करा, लिंबू बांधा... पण मला काही फरक पडणार नाही मी त्याला घाबरत नाही, अशी म्हणत सतेज पाटलांनी विरोधकांना प्रत्यूत्तर दिलंय.
कोल्हापुरातील कसबा बावडा भागात सतेज पाटलांचं 'यशवंत निवास' हे निवासस्थान आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या या घरासमोरच्या झाडामध्ये हळद-कुंकू लावलेली एक काळी बाहुली आढळली होती.
या अगोदर सतेज पाटलांनी आपण स्वत: विधानसभा निवडणुकीत 'कोल्हापूर दक्षिण' विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं. लोकसभा निवडणुकीला मात्र, ज्यांनी आपल्याला फसवलं त्यांना सोडून इतरांना मतदान करायचं, असा टोला सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांना हाणला होता.
कोल्हापूरमध्ये काळ्या जादूसारखे भंकस अंधश्रद्धेचे प्रकार काही नवीन नाहीत. यापूर्वीही, कोल्हापुरात लोकसभा ते ग्रामपंचाय निवडणुकींपर्यंत अनेक निवडणुकांत काळ्या जादूनं विरोधी उमेदवाराला घाबरवण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचं अनेकदा उघड झालेत. काही दिवसांपूर्वी सातारा जिल्ह्यातील मलकापुरातही राजकीय हेतून साध्य करण्याच्या उद्देशानं 'करणी' करण्याचा प्रकार उघड झाला होता.