दीपक भातुसे, झी २४ तास, मुंबई / नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची महत्त्वाची बैठक आज संध्याकाळी दिल्लीत होत आहे. सुजय विखे यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाला असला तरी हा प्रवेश थांबवण्यासाठी काँग्रेसकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले जाणार असल्याचे समजते. राहुल गांधी यांच्याकडे होणाऱ्या या बैठकीला प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थिती असणार आहेत. या बैठकीत राष्ट्रवादीकडे असलेली नगरची जागा मिळण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. नगरच्या जागेसाठी शेवटचा प्रयत्न म्हणून राहुल गांधी याबाबत शरद पवारांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. या बैठकीत राज्यातील काँग्रेसच्या जागा, उमेदवार, मित्रपक्षांना सोडायच्या जागा याबाबतही चर्चा होणार आहे. औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला हवी आहे ती द्यायची की नाही याचा निर्णयही आजच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राजकीय पळापळही सुरू झालीय... आणि राजकीय पळवापळवीही... गेले कित्येक दिवस राज्यांत ज्यांच्या पक्षबदलाची चर्चा होती, त्यांचा पक्ष अखेर ठरलाय. होय, सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्तही ठरलाय. गेले कित्येक दिवस त्यांचं तळ्यात-मळ्यात सुरू होतं. अखेर १२ मार्च रोजी भाजपामध्ये प्रवेश करायचं त्यांचं नक्की झालंय. सुजय विखे पाटलांना अहमदनगर दक्षिणमधून भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील मात्र काँग्रेस सोडणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. या सगळ्यात मोठी अडचण होणार आहे ती राधाकृष्ण विखे पाटलांची...


गेले काही दिवस सुजय विखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचीही चर्चा होती... मात्र सुजयला राष्ट्रवादीत घेऊन तिकीट देण्याऐवजी काँग्रेसला नगरची जागा सोडावी, असा काँग्रेसचा आग्रह होता. अखेर सुजय विखे पाटील भाजपावासी होणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेत्याचा मुलगाच पळवून भाजपानं काँग्रेसला मोठा दणका दिलाय.