मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 ची जोरदार तयारी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. शेती क्षेत्र आणि शेतकरी केंद्रस्थानी हा जाहीरनामा असल्याचे राष्ट्रवादीने सांगितले आहे. तिहेरी तलाकचा अध्यादेश रद्द करणार असल्याचे सांगत  समाजातल्या सर्व लोकांशी चर्चा करुन तिहेरी तलाकवर निर्णय घेतला जाईल असे राष्ट्रवादीने म्हटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात शेतकरी, महिला आणि युवकांवर भर देण्यात आला आहे. जाहीरनामा समिताचे प्रमुख दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. 


नोटबंदीनंतर किती नोकऱ्या गेल्या त्याची श्वेतपत्रिका काढणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे. शेतकऱ्यांसदर्भात महत्त्वाच्या घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहेत.  शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती तसेच शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी पीपीपी मॉडेलला प्रोत्साहन देण्यात येईल असे म्हटले आहे. शेतमजुरांना नरेगा योजनेतून मदत आणि शेतीला लागणारे साहित्य जीएसटीतून मुक्त करणार असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात युवकांनाही केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. शहरातील पदवीधरांना १०० दिवसाची नोकरीची हमी यात देण्यात आली आहे. मुलींना शिशुवर्गापासून पदव्युत्तरपर्यंत मोफत शिक्षण मोफत देणार असल्याचेही यात म्हटले आहे.