बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का पुसण्यासाठी अजितदादांचा मास्टर प्लान
NCP Ajit Pawar On Baramati: लोकसभेच्या तोंडावर जिल्ह्यातील भागातला पाणी प्रश्न तापल्याने लोक नाराजी व्यक्त करत आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मास्टर प्लान तयार केला आहे.
NCP Ajit Pawar On Baramati: बारामतीच्या जिरायती भागाचा शिक्का कायमस्वरूपी पुसण्यासाठी अजितदादांचा ॲक्शन प्लॅन तयार आहे.. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून होणाऱ्या प्रचार सभांमध्ये टाटा धरणातील वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे पाणी जिरायती भागात आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय. बारामतीतील उंडवडी कप या सभेत ते बोलत होते. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिरायती भागात प्रचार सभा सुरू आहेत. लोकसभेच्या तोंडावर जिल्ह्यातील भागातला पाणी प्रश्न तापल्याने लोक नाराजी व्यक्त करत आहेत. त्यावर उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्लान तयार केला आहे.
काय आहे प्लान?
मुळशी जवळच्या टाटा धरणातील पाणी वीज निर्मितीसाठी न वापरता या पुढील काळात जिरायती भागातल्या लोकांना देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिलंय. बारामतीच्या जिरायती भागातील दुष्काळ आणि जिरायती शब्द पुसून टाकण्यासाठी अजित पवार यांनी पुरंदर उपसा सिंचन योजना जाणाई शिरसाई उपसा सिंचन योजना यासह नवे प्रकल्प सुरू करण्याचे आश्वासन पवार यांनी दिलं आहे.
'पाण्यासाठी आम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवले'
इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आहे. येथे प्रत्येकाला संधी दिली जाते. मी कामाला सुरुवात केल्यावर मागे वळून बघितले नाही. केंद्राचा निधी आणला गेला नाही. अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचे जमत नाही पण आम्ही मिळते जुळते घेतलं. हे का घेतलं तुम्ही जाणून घ्या. पाण्यासाठी आम्ही सगळे मतभेद बाजूला ठेवले, असे अजित पवारांनी आपल्या भाषणातून सांगितले.कामे होण्यासाठी मी सरकारमध्ये गेलो. हर्षवर्धन पाटील आणि आम्ही खूप भांडलो. आपण साठीच्या पुढे गेलो. अजून किती दिवस? असे आता हर्षवर्धन पाटील म्हणाले. म्हणून आम्ही एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले.
पाण्यासाठी पंतप्रधानांकडे मागणी
मी इतर बाबतीत काम केलं पण पाण्याचा प्रश्न मी सोडवत होतो. पाण्यासाठी मला निधी पाहिजे असे मी पंतप्रधान मोदींना सांगितलं आहे. त्यामुळे भावनिक होऊ नका. अजून 10 वर्ष तुमचं काम करू शकतो. रात्री 2 ला झोपतोय आणि 5 ला उठतोय असे ते यावेळी म्हणाले. मला जिरायत भाग हा शब्द काढून टाकायचा आहे. निकाल लागला की दुसऱ्या दिवशी अजित पवार कामाला लागला असे समजा. आता पण एकच वादा आणि रात्री पण एकच वादा असे करा नाहीतर रात्री वेगळंच करू नका, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.
विरोध करून प्रश्न सुटत नाहीत
सुनेत्रा यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. संस्था काढणे महत्त्वाचे पण संस्था चालवणे त्यापेक्षा महत्त्वाचे. वसंत दादा यांनी 8 संस्था काढल्या त्या सगळ्या संस्थांची वाट लागली. आपले दात आणि आपलेच ओठ. आता उणीधुणी काढायची नाहीत. जे तुम्हाला येऊन भेटत आहेत, त्यातील एकही तुमच्या पाण्याचा प्रश्न सोडवू शकत नाही. विरोध करून प्रश्न सुटत नाहीत, असे अजित पवारांनी यावेळी सांगितले.
मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही
अक्षरश: माणूस शिजून निघत आहे. भात आणि अंड्याची पोळी जर येथे उन्हात ठेवली तर ते देखील शिजून निघेल एवढा कडक उन्हाळा आहे. तरीदेखील तुम्ही या ठिकाणी सभेला उपस्थित राहिलात. मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही. वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी मी तुमच्यासाठी ते करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.