Loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या देशासह राज्यातही अनेक पक्ष जागावाटपाचं समीकरण निर्धारित करण्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आले आहेत. राष्ट्रवादीचा अजित पवार गटही (Ajit Pawar) यास अपवाद ठरलेला नाही. अजित पवार गटाकडून 5 हून अधिक जागांवर निवडणूक लढणार असल्याची ठाम भूमिका घेतलेली असतानाच आता या जागांवर नेमकी कोणाची वर्णी लागणार हे मात्र अद्याप ठरू शकलेलं नाही. याच जागावाटपासंदर्भात अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. इतकंच नव्हे, तर त्यांनी विरोधकांवर सडकून टीका करत विजय शिवतारे यांनाही खडे बोल सुनावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेच्या किती जागा मिळतील आणि कुणाकुणावर जबाबदारी दिली जाईल हे बैठकीनंतरच समजेल, असं म्हणताना सातही मतदार संघात आमचा दावा कायम असल्याची भूमिका मिटकरी यांनी स्पष्ट केली. यावेळी त्यांनी जानकरांच्या उमेदवारीवर वक्तव्य करताना, 'ते  बारामतीतून लढणार या चर्चेला काही किंबहुना या कपोकल्पित चर्चा आहेत, आमच्यातलाच एक गट वातावरण बिघडावं म्हणून अशा प्रकारच्या कंड्या पेरतोय' असं मिटकरींनीच स्पष्टच सांगितलं. बारामतीतून सुनेत्रा पवारच उमेदवार असतील याचा पुनरुच्चार त्यांनी केला. 


बारामतीत (Baramati Loksabha) पवारांची मक्तेदारी मोडून काढण्याच्या विडा उचलण्याचं वक्तव्य करणाऱ्या शिवतारे यांच्याविषयी वक्तव्य करताना कोणीही कौटुंबीक वैफल्यग्रस्त असतो तेव्हाच अशी वक्तव्य करतो या शब्दांत त्यांनी टीका केली. 


हेसुद्धा वाचा : Loksabha Election : सुप्रिया सुळेंपुढे होम ग्राऊंड बारामतीत अजित पवारांसह इतरही कैक आव्हानं; विरोधकांची नावं पाहूनच घ्या 


'त्यांनी निवडणूक लढवावी यावेळी त्यांचं डिपॉझिटही वाचणार नाही. किंबहुना अजितदादांना बोलून त्यांना असुरी आनंद घ्यायचा असेल तर तो घ्यावा', असं मिटकरी म्हणाले. 'मुळात शिवतारेची एवढी औकात नाही की तो एवढा बोलेल...शिवतारेच्या मागचा मास्टरमाइंड दुसराच आहे. बारामतीत ज्यावेळेस आम्ही प्रचाराला जाऊ त्यावेळेस तो मास्टरमाईंड कोण आहे हे जनतेसमोर आणू, तोवर काही गोष्टी गुलदस्त्यात ठेवा' असा उल्लेख करत मिटकरी यांनी विजय शिवतारे यांच्यावर तोफ डागली. 


कितीही चक्रव्यूह आखा पण, बारामतीचा नागरिक पवारांच्या पाठीशी आहे, असं म्हणत बारामती मददार संघावर अजित पवार गटाचच वर्चस्व असेल असंच मिटकरी यांनी ठामपणे सांगितलं.