Loksabha Election 2024 BJP MNS Alliance: लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकींचं वर्ष म्हणून 2024 फार महत्त्वाचं मानलं जात आहे. अशातच मागील वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांपासूनच तयारी सुरु केली आहे. बैठका, आढावा बैठकांची सत्र सुरु झाली आहेत. राज्यातील युती, आघाड्या आणि जागा वाटपांसंदर्भातील बातम्या समोर येत आहेत. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी बातमी समोर येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे. ही बातमी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, भाजपा आणि अजित पवार गटाबरोबर राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा चौथा जोडीदार म्हणून या युतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागील कारण म्हणजे नुकतीच झालेली एक बैठक.


मनसेनं दिला वृत्ताला दुजोरा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी (6 फेब्रुवारी रोजी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'सागर' बंगल्यावर भेट घेतली. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांनी फडणवीस यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने भाजपाबरोबर युतीची चर्चा मनसे करत आहे का अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतल्यानं युतीच्या चर्चांना उधाण आलंय.


नक्की वाचा >> 'राष्ट्रवादी अजित पवारांची' निकालावर फडणवीसांची 4 शब्दांत प्रतिक्रिया! म्हणाले, 'हा निर्णय..'


कालच राज ठाकरेंनी दक्षिण मुंबई मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीदरम्यान त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. सध्या मनसे कोणत्या जागांवर कोणते उमेदवार देता येतील याची चाचपणी केली जात आहे. मंगळवारी मनसेच्या नेत्यांनी फडणवीस यांच्याबरोबर 'सागर' बंगल्यावर जाऊन चर्चा केल्याच्या वृत्ताला मनसेचे नेते संदीप देशपांडेंनीही दुजोरा दिला आहे. मात्र अधिक तपशील त्यांनी दिला नाही. त्यामुळे या बैठकीबद्दलचं गूढ अधिक वाढलं आहे.


भाजपा-मनसे जवळीक वाढली


2 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या गटाने भाजपाबरोबर सत्ता स्थापन केल्यापासून राज ठाकरे आणि भाजपामधील जवळीक वाढली आहे. मागील काही महिन्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठींचं प्रमाण वाढल्याचं दिसत आहे. अनेकदा राज आणि फडणवीस हे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच मागील 2 वर्षांमध्ये अनेकदा मनसे- भाजपा युतीबाबत राजकीय वर्तुळामध्ये वावड्या उठल्या आहेत.


नक्की वाचा >> ..म्हणून मोदी-शाहांनी राष्ट्रवादी अजित पवारांना दिली; संजय राऊतांचा दावा


भाजपच्या अनेक नेत्यांनी मागील काही काळापासून दोन्ही पक्षांच्या एकत्र येण्यासंदर्भात सकारात्मक विधानं केली आहेत. बऱ्याचदा भाजपाचे दुसऱ्या फळीतील नेतेही राज ठाकरेंना भेटले आहेत. असं असतानाच आता मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी फडणवीसांची गुप्त भेट घेतल्याने भाजप- मनसेमध्ये युतीची लवकरच घोषणा होईल की काय? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


नक्की वाचा >> 'आमची विचारधारा BJP, शिवसेनेसारखीच'; रात्रीच्या गुप्त बैठकीवर मनसे म्हणाली, 'युती करायची याचा..'


टोलनाक्याचा मुद्दा वगळता दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालेलं नाही.