Sanjay Raut On NCP Election Commission Verdict: राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि पक्षाचे घड्याळ चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाकडे सोपवल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात असतानाच आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
"राष्ट्रवादीचा निकाल हा शिवसेनेसारखाच लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांनी स्थापन केला. त्या पक्षाचे निर्माते, कर्तेधर्ते, संस्थापक आज अस्तित्वात आहेत. ते स्वत: निवडणूक आयोगासमोर जाऊन बसले. मी शरद पवार. मी पक्ष स्थापन केला. तरीही आयोग पक्ष एका आयाराम गयाराम, ऐऱ्यागैऱ्याच्या हातात देतो. जसा शिवसेना शिंदेंच्या हातात गेला. इतिहासामध्ये असा अन्याय झाला नसेल. जो शिवसेनेच्या बाबतीत अन्याय झाला तोच शरद पवारांबरोबर झाला. पक्षाचे संस्थापक समोर असताना आयोग तो संपूर्ण पक्ष एखाद्याच्या हातात सोपवत असेल तर याला सध्या मोदी गॅरेंटी म्हणतात," असा टोला राऊत यांनी लगावला.
"आधी भ्रष्टाचार करा, प्रचंड भ्रष्टाचार करा, आम्ही तुमच्या भ्रष्टाचारावर हल्ले करु. आम्ही तुमच्या भ्रष्टाचारामध्ये ईडी, सीबीआय लावू मग तुम्ही तुमचाच पक्ष फोडा आणि आमच्या पक्षात या. आम्ही तुम्हाला पावन करु. ज्या पक्षावर आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केला तो पक्ष तुम्हाला देऊ. नॅशनलीस्ट करप्ट पार्टी असं मोदी आणि शाह या पक्षाला म्हणाले होते. अजित पवार हे करप्ट आहेत, असंही म्हणाले होता. हा नियतीने त्यांच्यावर उगवलेला सूड आहे की तोच पक्ष अजित पवारांना दिला आणि त्यांना आपल्या पक्षात घेतलं. हे आपल्या देशाची, लोकशाहीची आणि निवडणूक आयोगाची शोकांतिका आहे. निवडणूक आयोग हा भारतीय निवडणूक राहिलेला नसून आज तो मोदी-शाहांचा निवडणूक आयोग झाल्याने असे निर्णय घेतले," असंही राऊत म्हणाले.
मोदी-शाहांचा महाराष्ट्रावर राग असल्यानेच त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे मराठी लोकांची काळजी करणारे पक्ष तो पक्ष फोडणाऱ्यांना दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. "मोदी-शाहांचा महाराष्ट्रावर राग आहे. त्यांना महाराष्ट्रावर सूड घ्यायचा आहे. त्यांना मराठी माणसाचा बदला घ्यायचा आहे हे स्पष्ट घ्यायचं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही 100 टक्के शुद्ध मराठी अस्मिता जपणारे पक्ष होते. महाराष्ट्रावरील अन्यायाविरोधात आवाज उठवणारे पक्ष होते. त्यांनी दोन्ही पक्षांची वाताहात करुन दाखवून दिलं की आम्ही महाराष्ट्राचा सूड घेतलेला आहे. पण या राज्याची जनता हा सूड उटलवून लावल्याशिवाय राहणार नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना, जिथे शरद पवार तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे महाराष्ट्रातील जनतेचं धोरण आहे," असं विधानही राऊत यांनी केलं.