शिंदेंविरोधात भाजपाची कुटनिती? आधी 2 उमेदवार बदलले, अचानक राणे आक्रमक झाले अन् आता..
Loksabha Election 2024 BJP Pressurising Shinde Group: शिंदे गटाने जाहीर केलेले 2 उमेदवार भाजपाच्या दबावामुळे बदलावे लागलेले असतानाच भाजपाला मुख्यमंत्री शिंदेंचा दबदबा असलेला ठाणे मतदारसंघंही हवा आहे.
Loksabha Election 2024 BJP Pressurising Shinde Group: जागावाटपावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये रस्सीखेच सुरुच असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच भाजपाच्या दबावामुळे शिंदे गटाला हिंगोलीबरोबरच यवतमाळ-वाशीमचा उमेदवार बदलावा लागला आहे. हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना जाहीर झालेली उमेदवारी मागे घेत बाबुराव कदम कोहाळीकर यांना उमेदवारी देण्यात आली. तर हेमंत पाटलांऐवजी त्यांची पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिममधून भाजपाच्या दबावामुळे उमेदवारी देण्यात आली. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या जागावाटपामध्ये भाजपाचा प्रभाव दिवसोंदिवस वाढत असल्याने शिंदे गटामध्ये अस्वस्थता आहे. बरं हा दबाव केवळ उमेदवार बदलेल्या मतदारसंघापुरता सिमीत नाही. नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि ठाण्याच्या जागेवरुनही शिंदेंना भाजपाबरोबर संघर्ष करावा लागत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी अचानक घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मुख्यमंत्री शिंदेही चक्रावले असून राणेंना पक्षाचा पाठींबा असल्याचं समजतं. आधी उमेदवार बदलले, अचानक राणे आक्रमक झाल्यानंतर आता ठाणे जागाही भाजपाला हवी आहे.
3 खासदारांचा पत्ता कट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर भाजपासोबत आलेल्या 3 खासदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. रामटेकचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्याऐवजी काँग्रेसमधून आयात केलेल्या राजू पारवेंना उमेदवारी देण्यात आली आहे. यामागेही भाजपा नेत्याचाचा संदर्भ आहे. भावना गवळींनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. भाजपाने अंतर्गत सर्वेक्षणाची आकडेवारी दाखवत हिंगोली, यवतमाळ, नाशिक, हातकणंगले येथील उमेदवार बदलण्याचा भाजपाचा हट्ट शिंदेंनी आधी टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपा आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आणि निवडणुकीचा पहिला टप्पा जवळ आल्याने शिंदेंनी उमेदवार बदलले. विशेष म्हणजे शिंदेंचा गृह जिल्हा असलेल्या ठाणे मतदारसंघासाठीही भाजपा आग्रही आहे. यासाठीही सर्वेक्षणाची आकडेवारी पुढ करण्यात आली असून त्याला शिंदे गटाने विरोध केला आहे.
ठाण्यासाठीही भाजपाचा आग्रह
ठाणे आणि कल्याणपैकी एक मतदारसंघ द्यावा अशी भाजपाची मागणी आहे. यासाठीही सर्वेक्षणाची आकडेवारी भाजपाने पुढे केली आहे. ठाण्यातून संजीव नाईक यांना उमेदवारी दिली तर विजयाची संधी अधिक असल्याचा दावा करणारा अहवाल भाजपाने मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्याचे समजते. मात्र ठाण्याची जागा ही शिंदे गटासाठी भावनिक मुद्दा असल्याचा युक्तीवाद शिंदे गटाने केला. ही जागा मागील 25 वर्षांपासून शिवसेनेकडे असल्याने हा भावनिक मुद्दा आहे. इथूनच शिवसेनेचं धनुष्यबाण दिल्लीपर्यंत पोहचवण्याचं काम आनंद दिघेंनी केलेलं. आता ही जबाबदारी त्यांचे शिष्य असलेल्या शिंदेंवर आहे. म्हणूनच ही जागा शिवसेनेलाच मिळावी, असं शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधाना म्हटलं. सर्वेक्षणाच्या आकडेवारीसंदर्भात बोलताना सरनाईक यांनी, अनेकदा सर्वेक्षणातील आकडेवारी प्रत्यक्षात उतरत नाही. अहवालामधील निष्कर्ष बदलण्याची ताकद शिवसेनिकांमध्ये आहे. केवळ सर्वेक्षणावर आपण वेगळे निर्णय घेत राहिल्यास कार्यकर्त्यांची गरज काय? असा सवाल उपस्थित केला.
राणेंची अचानक आक्रमक भूमिका
दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू गेले वर्षभर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत होते. सामंत यांनी मधल्या काळात भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंची भेट घेऊन चर्चा केली होती. महायुतीच्या जागावाटापाच्या चर्चेमध्ये ही जागा शिंदे गटाला सोडली जाईल असं चित्र दिसत होतं. सामंत बंधूच येथून लढतील असं मानलं जात होतं. मात्र अचानक नारायण राणेंनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन या जागेवर दावा सांगताना शिंदे गटावर निशाणा साधला. राणेंच्या या आक्रमक भूमिकेमुळे खुद्द मुख्यमंत्रीही अवाक झाल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. मात्र राणेंच्या या आक्रमक भूमिकेला भाजपाचं पाठबळ असल्याची तक्रार शिंदेंकडे त्यांच्या पक्षातील नेते करत आहेत.