Loksabha Election 2024: महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यातील मतदान केंद्रात जाऊन नागरिक आपला हक्क बजावत आहेत. आजच्याच दिवशी लग्न कार्याचेदेखील मुहूर्त आहेत. पण आधी लगीन लोकशाहीचं म्हणत नवरदेव-नवरी मुंडावळ्यांसह मतदान केंद्रात आल्याचे पाहायला मिळाले. नांदेड वाशिम, जालनामध्ये असे प्रकार पाहायला मिळाले. 


वैष्णवी चूनुकवाडने बजावला हक्क


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेडमध्ये लग्नाआधी एका नववधूने मतदान केंद्र गाठत आपला मतदानाचा हक्क बजावला. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बरबडा येथील वैष्णवी चूनुकवाड हिचे आज लग्न आहे. गावात तिचा लग्नसोहळा आहे. लग्नासाठी नटून थटून तयार झालेली नवरी आधी मतदान केंद्रावर पोहोचली. नववधूने आपले मतदान केले. आधी लग्न लोकशाहीचे अशी प्रतिक्रिया नववधूने दिली.


हरीश मुसळेंचे आधी मतदान मग मंडप


वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सकाळी 7 वाजता पासून सुरुवात झाली असून आज मतदानाच्या दिवशीच लग्न तिथी आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आश्वासनाला सकारात्मक प्रतिसाद देत वाशीम जिल्ह्यातील ब्रम्हा या गावातील हरीश त्र्यंबक मुसळे यांनी आधी मतदान करून मगच लग्न विधीसाठी गेले. वंजारी समाजात नवरदेव अगोदरच्या दिवशी वधु मंडपी पाठवीण्याची प्रथा असते. मात्र मतदानाचे महत्त्व जाणून वराने सकाळी सर्व विधी पार पाडले. तसेच वधुच्या डव्हा या गावातून थेट आपल्या गावी येत मतदानाचा हक्क बजावला.


प्रभू कोळेकर सकाळी लवकर मतदान केंद्रात


याच ब्रम्हा गावातील प्रभू कोळेकर नावाच्या वराने लग्नाची विधीची पर्वा न करता आधी मतदान करून मगच वऱ्हाडीसोबत लग्नासाठी निघाले. दरम्यान, लग्नासाठी दुसऱ्या गावी जाणाऱ्या वऱ्हाडी मंडळींनीसुद्धा सकाळी लवकर मतदान करून आपले कर्तव्य पार पाडले.


 निता भापकर आणि रविकुमार शिंदेंनी बजावला मतदानाचा हक्क


परभणी लोकसभा मतदारसंघातील वाटूर येथे बोहल्यावर चढण्याआधी नवरदेव नवरीनं मतदानाचा हक्क बजावलाय. निता भापकर आणि रविकुमार शिंदे यांचा आज विवाह आहे. आणि दोघेही याच गावातील असल्यामुळं दोघांचेही मतदान एकाच बुथवर आलं. त्यामुळं बोहल्यावर चढण्याआधी दोघांनीही एकत्र एक लोकशाहीचा हक्क बजावत मतदान केलंय.