Loksabha Election 2024 Nashik Constituency Eknath Shinde Group Announced Candidate: नाशिकमधून महायुती कोणाला उमेदवारी देणार यासंदर्भात मागील काही आठवड्यांपासून सातत्याने उलट सुलट चर्चा सुरु होत्या. मात्र या प्रश्नाला उत्तर मिळालं असून शिंदे गटाने नाशिकमधील आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिंदे गटाने हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे नाशिकमधून उमेदवारी अर्ज भरणारे शांतिगिरी महाराज असो किंवा येथून निवडणूक लढण्यास उत्सुक असलेले छगन भुजबळ असो दोघांचाही पत्ता कापला गेला असून हेमंत गो़डसेच नाशिकचे महायुतीचे उमेदवार असतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे.


मतदारसंघातील उमेदवारीवरुन सुरु होता गोंधळ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाविकास आघाडीचे सरकारविरोधात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामध्ये हेमंत गोडसे हे ठाकरेंविरोधात गेले होते. शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत भाजपाने अनेक जागा पदरात पाडून घेण्यासाठी संघर्ष करायला लावल्याचं चित्र मागील काही आठवड्यांमध्ये पाहायला मिळालं. यामध्ये नाशिकच्या जागेचाही समावेश होता. नाशिकच्या जागेवर अजित पवार गटाच्या छगन भुजबळांना उभं करावं अशीही जोरदार चर्चा होती. भुजबळांनाही यासाठी रस असल्याचं स्पष्ट होतं. मात्र उमेदवारी जाहीर करण्यात होत असलेली दिरंगाई आणि चालढकलपणाला कंटाळून भुजबळांनी माघार घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर इथून अचानक काही दिवसांपूर्वी शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या अर्जावर शिवसेना शिंदे गट पक्षाचा उल्लेख होता. मात्र या अर्जाबरोबर पक्षाकडून दिला जाणारा एबी फॉर्म नव्हता. म्हणूनच येथील उमेदवारीसंदर्भातील संभ्रम कायम होता. अखेर यावर आज पडता पडला.


सोशल मीडियावरुन दिली माहिती


शिंदे गटाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुन यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. "लोकसभा निवडणूक - 2024 साठी नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा," अशा कॅप्शनसहीत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.



कोण आहेत हेमंत गोडसे?


कोण आहेत हेमंत गोडसे? हेमंत गोडसे हे नाशिकमधून मागील दोन टर्म खासदार राहिले आहेत. हेमंत गोडसे हे नाशिक तालुक्यातील संसरी गावातील रहिवासी आहेत. या गावातून या आधी 1996 मध्ये गोडसे कुटुंबीतील राजाभाऊ गोडसे हे आधी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले आणि नंतर ते खासदार झाले होते. राजाभाऊ यांचे राजकीय वारस म्हणूनही हेमंत गोडसे यांच्याकडे पाहिले जाते. यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून ते नाशिकमध्ये प्रसिद्ध आहेत. हेमंत गोडसेंचा जन्म 3 ऑगस्ट 1970 चा आहे. त्यांनी सविहिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. गोडसेंचे वडील तुकाराम गोडसे हे लष्कराच्या एमईएस विभागात नोकरी करुन शेती करत होते. हेमंत गोडसेंच्या आई द्रौपदाबाई गावातील राजाकरणामध्ये सक्रीय होत्या. घर संभाळून त्या ग्रामपंचायतीच्या सदस्या म्हणून कार्यरत होत्या. गोडसेंची पत्नी अनिता गृहिणी असून त्यांना अजिंक्य आणि सागर अशी दोन मुलं आहेत. यंदा गोडसेंना तिसऱ्यांदा खासदारकीसाठी संधी देण्यात आली आहे.