Loksabha Election 2024 Nitin Gadkari Nagpur Constituency: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 48 पैकी 5 मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. याच मतदारसंघांमधील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून या मतदारसंघांमध्ये बहुचर्चित नागपूर आणि रामटेक मतदारसंघाचा समावेशही होतो. आज दुपारी 3 वाजेपर्यंत या मतदारसंघांमधील उमेदवारांची नाव निश्चित होतील. विशेष म्हणजे सध्याची स्थिती लक्षात घेता कोणीच उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरुद्ध नागपूरमधून तब्बल 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील. (लोकसभा निवडणुकीसंदर्भात 30 मार्चला घडलेल्या राजकीय घडामोडींचे लाईव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)


मोठं शक्तीप्रदर्शन करत भरला अर्ज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीन गडकरींनी 27 मार्च रोजी मोठं शक्तीप्रदर्शन करत निवडणूक अर्ज दाखल केला. यावेळेस भाजपा कार्यकर्त्यांची मोठ्याप्रमाणात हजेरी होती. मोठी रॅली काढतच निवडणूक अर्ज भरण्यासाठी गडकरी पोहोचले होते. नागपूर भाजप आणि नितीन गडकरींच्यावतीने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. विशेष म्हणजे गडकरींविरुद्ध महाविकास आघाडीने काँग्रेसचा उमेदवार दिला आहे. नागपूरचे विद्यमान आमदार विकास ठाकरे यांनी गडकरींच्या एकदिवस आधी म्हणजेच 26 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनीही मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांची रॅली काढत शक्तीप्रदर्शन केलं होतं.


...तर गडकरींविरुद्ध 25 उमेदवार


नागपूरबरोबरच आज रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या 5 मतदारसंघांमधील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. महाराष्ट्रामधील पहिल्या टप्प्यातील मतदान या 5 मतदारसंघांमध्ये होणार आहे. या ठिकाणी 19 एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. या पाचही लोकसभा मतदारसंघात किती उमेदवार प्रत्यक्षात रिंगणातत राहतात याचे चित्र आज दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार असून सर्वांचं लक्ष नागपूरकडे लागून राहिलेलं आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात 26 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार विकास ठाकरे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज परत घेण्याची मुदत दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. दुपारी 3 नंतर नागपूरमधील लढतींचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. पण कोणीच अर्ज मागे घेतला नाही तर गडकरींविरुद्ध तब्बल 25 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील हे निश्चित आहे.